
गुजरातच्या गोध्रा येथे घडलेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 कैद्यांची सुटका करण्यात आली होती. यानंतर या कैद्यांच्या स्वागतासाठी फटाके फोडण्यात आले होते, डीजेवर गाणी लावून धिंगाणा घालण्यात आला होता आणि मिठाई देखील वाटण्यात आली होती. देशातील अनेकांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता. याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. ‘बलात्काऱ्याला फाशी द्या हेच माझ्या आजोबांचे हिंदुत्व होते. बलात्कारी कोणत्याही धर्म, पंथ, प्रांताचा असो त्याला फाशी झाली पाहिजे असे बाळासाहेबांचे म्हणणे होते.’ असे आदित्य यांनी म्हटले आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले की, “राजकारणाची पीछेहाट होत चालली आहे. मी माझ्या आजोबांकडून जे राजकारण शिकलोय त्यात कुठल्याही बलात्काऱ्याची पूजा करणे, आरती करणे शिकवण्यात आलं नाही. बलात्काऱ्याला फाशी द्या हेच माझ्या आजोबांचे हिंदुत्व होते. बलात्कारी कोणत्याही धर्म, पंथ, प्रांताचा असो त्याला फाशी झाली पाहिजे असे हिंदूहृदयसम्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे होते. धर्माविरोधात कोणी आला तर त्याच्याविरोधात आम्ही उभे राहू मात्र हिंदू धर्म हे देखील सांगतो की सगळ्यांची सेवा करा. तेच आम्ही कोरोना काळात केलं होतं.” असे आदित्य यांनी म्हटले आहे.






















































