
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
तरुणांशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या विशेष मोहिमेवर निघालेल्या शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ हा संभाजीनगरातील पहिलाच कार्यक्रम ‘सुपरहिट’ ठरला. शिक्षण, राजकारण, पर्यावरण, मुलींचे संरक्षण इथपासून ते मराठवाडय़ातील दुष्काळापर्यंतच्या विविध विषयांवर तरुणांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी दिलखुलास आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. ‘शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांत फरक काय?’ या प्रश्नाच्या बाऊन्सरवर ‘जे बोलतो, ते करून दाखवतो, हाच शिवसेनेचा बाणा आहे आणि फरकही तोच आहे,’ असा षटकार आदित्य ठाकरे यांनी खेचला आणि त्याचक्षणी झालेल्या टाळय़ांच्या कडकडाटात तरुणाईची मनेही जिंकून घेतली.
तरुणांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विचार जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे मंगळवारी सायंकाळी संभाजीनगरात दाखल झाले. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे सायंकाळी 7.30 वाजता व्यासपीठावर आगमन होताच त्यांनी हात उंचावून तरुणाईला अभिवादन केले. ‘प्लस’च्या आकाराचे ‘रॅम्प’सारखे व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या तीन बाजूंनी प्रश्न विचारण्यासाठी उसळलेली तरुणांची गर्दी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. टाळय़ांच्या गजरात व्यासपीठावर स्वागत होताच आदित्य ठाकरे यांनी ‘मतदानाला तयार आहात ना?’ असा सवाल करून संवाद सुरू केला. मतदानाला अर्थ काय, असा सवाल काही लोक करतात तेव्हा त्यांना एवढेच सांगतो, लोकसभा, विधानसभा, मनपामध्ये निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतात? मला जे पाहिजे ते करतात का? जे वचन दिले ते पाळतात का? हे निवडणुकीत विचारण्याचा मतदारांना अधिकार आहे. आपण दहावी, बारावीची परीक्षा देतो त्याचप्रमाणे राजकीय पक्ष निवडणुकीची परीक्षा देत असतात. आज मी तुमचे प्रश्न, संकल्पना, अपेक्षा ऐकायला आलो आहे. तुम्ही विचारलेले जास्तीत जास्त प्रश्न वचननाम्यामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
शहरातील वाहतुकीसाठी शंभर स्मार्ट सिटी बसेस खरेदी केल्या जात आहेत. इलेक्ट्रिक बसेसदेखील लवकरच शहरात दाखल होतील. कमीत कमी किमतीत शहरवासीयांना प्रवासाची सुविधा मिळाली पाहिजे, याची आम्ही काळजी घेऊ. संभाजीनगर शहराचा चारशे मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न तीन महिन्यांत सुटेल. चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात असून लवकरच मशीनद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे, याकडेही आदित्य ठाकरे यांनी तरुणांचे लक्ष वेधले.






























































