40 गद्दार आमदार अपात्र ठरणार म्हणजे ठरणारच, संविधान तेच सांगते! आदित्य ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला आहे. या निकालात तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या निकालाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना हे खोके सरकार अनैतिक असल्याचे सिद्ध झाले असून गद्दार 40 आमदारांचा फक्त 3 ते 4 महिन्यांचा खेळ शिल्लक आहे, असे सांगितले.

आज देशभरात दोन महत्त्वाचे निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या सत्तासंघर्षाचा निकाल देण्यात आला आहे. दिल्लीबाबतच्या निकालात तेथील नायब राज्यपालांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आता त्यांनाही काम करण्याची चौकट आखून दिली आहे. राज्यपालांचे कार्यालय आपल्या देशात कदाचित हूकुमशाही चालण्यासाठी वापरले जात आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. संघराज्य म्हणजे राज्यांचा काही अधिकार ठेवला आहे किंवा नाही, यावरही विचार करण्याची गरज आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बारकाईने वाचल्यास जे 40 गद्दार आमदारांचा फक्त 3 ते 4 महिन्यांचा खेळ उरला असल्याचे स्पष्ट दिसून येते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. ज्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष याबाबतची सुनावणी घेतील, त्यावेळी हे 40 आमदार अपात्र ठरणार म्हणजे ठरणारच, याबाबत आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले. आपले संविधान तेच सांगते. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. यात सत्याच्या बाजूने निकाल आला आहे.

विजय हा सत्याचा होणार, सत्तेचा नाही, हे आपण सुरुवातीपासून सांगत आहोत. ही जी गद्दारी झाली, त्यात आमचा हात नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत होते. डीसीएम म्हणजे दिसरे मुख्यमंत्री याबाबत जे बोलत होते, त्यावरून यामागे हात कोणाचा होता, ते स्पष्ट होते, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यापालांचाही महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात मोठा हात होता, हेही निकालातून दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर घटनाबाह्य सरकारने खोके सरकारच्या गद्दार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत निवडणुकांना सामोरे जायला हवे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव आज मातोश्रीवर आले होते. या देशात लोकशाही धोक्यात असून हूकुमशाही वाढत आहे, अशी भावना असलेले पक्ष हूकुमशाही वृत्तीविरोधात लढण्यासाठी एकत्र येत आहेत. देशातील लोकशाही आणि संविधानासाठी हे महत्त्वाचे असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.