जल्लोष ‘मराठी दांडिया’चा, आदित्य ठाकरे यांनी भेट देत वाढवला उत्साह

कांजूर मार्ग पूर्व येथील परिवार मैदान येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विक्रोळी विधानसभेच्या वतीने आयोजित ‘मराठी दांडिया’ला तुफान प्रतिसाद मिळाला. रविवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मराठी दांडियाला भेट देत सर्वांचा उत्साह वाढवला.

विक्रोळी विधानसभेचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या संकल्पनेतून ‘मराठी दांडिया’चे आयोजन करण्यात आले होते. अस्सल मराठमोळ्या गाण्यांच्या तालावर थिरकण्यासाठी यंदा तरुणाईची पावले आपोआप कांजूर मार्गच्या दिशेने वळली.

पहिल्या दिवसापासूनच येथे आबालवृद्धांसह मराठी सिनेनाटय़ क्षेत्रातील कलाकारांची गर्दी झाली. रविवारदेखील परिवार मैदानात नागरिकांची झुंबड उडाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह संजय नार्वेकर, भाऊ कदम, अरुण कदम, स्मिता गोंदकर आदी सिने कलाकारांनी हजेरी लावली. मराठी सिने कलाकारांचा कल्ला आणि कांजूरकरांचा जल्लोष यानिमित्ताने पाहायला मिळाला. सोमवारी शिवानी बावकर, प्रथमेश परब या मराठी कलाकारांच्या उपस्थितीत मराठी दांडियाची सांगता झाली.