आष्टी येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
theft cirme
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। आष्टी

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी पहाटे गावात दरोडेखोरांनी दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी घरात चाकूच्या धाकाखाली महिलेचा पाच लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.

बुधवार रोजी पहाटे साडे तीन वाजता मोंढा परिसरात असलेल्या जयप्रकाश गुप्ता यांच्या घराचे गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्य जागे झाल्याने चोरटे तेथून पळाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा त्याच परिसरात असलेल्या शेरू पठाण यांच्या घराकडे वळवला. तेथील लोखंडी गेट च्या खालून घरात प्रवेश करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही घरातील सदस्य जागे झाल्याने चोरटे पळाले. यावेळी त्यांनी घरातील सर्व खोल्यांच्या बाहेरील बाजूच्या कड्या लावल्या होत्या. मात्र आरडाओरडा झाल्याने चोरट्यांना पळ काढावा लागला.

तेथून या चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील पाटील गल्लीत राहत असलेल्या माजी सरपंच केशवराव थोरात यांच्या घराकडे वळवला. घराच्या पाठीमागील भिंतीवरून आत प्रवेश केला. या वेळी घरात पाहुणे आलेले होते घरातील त्यांचे दोन्ही मुले वर माडीवरील आपापल्या खोल्यात झोपलेले होते तर पाहुणे म्हणून आलेले नातेवाईक केशवरावसह समोरच्या बैठकीत झोपले होते तर दोन पाहुणे महिला आणि केशवराव यांच्या पत्नी मधल्या खोलीत झोपलेले होते. पहाटे चार वाजता घरातील महिला उठली असता तिला घराच्या चौकात एक चोरटा उभा असल्याचे दिसला. तिने पती श्रीकांत यांना माहिती दिली. तोवर चार चोरट्याने बैठकीकडे जाणारा मधला दरवाजात प्रवेश करून बंद केला. त्यानंतर चोरटयांनी दागिणे व रोख रक्कम पळवली.

या प्रकरणी श्रीकांत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दागिन्यासह पाच लाख ३६ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या अगोदरही आष्टीत अनेक छोट्या-मोठ्या घरफोड्या चोऱ्या झालेल्या असून त्याचा तपास ही अद्याप गुलदस्त्यात असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.