वेधक – जनजागृतीचा लातूर पॅटर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

हजार शब्दांत जे व्यक्त करता येत नाही ते एका छायाचित्रातून सहज व्यक्त होते, असे म्हटले जाते. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे चिंतित झालेल्या लातूर जिल्हा पोलीस दलाने अशाच प्रभावी माध्यमाचा वापर करून जनजागृतीसाठी अनोखा ‘लातूर पॅटर्न’ राबवला आहे.

लातूर जिल्हय़ात सन 2025मध्ये एकूण 849 चारचाकी, तीनचाकी, दुचाकी वाहन आणि इतर प्रकारचे रस्ते अपघात झाले आहेत. त्यात एकूण 240 व्यक्तींनी आपला जीव गमावला आणि 57 व्यक्ती गंभीर आणि किरकोळ जखमी झालेले आहेत. लातूर जिल्हा पोलीस दलाने सदर अपघातांचे विश्लेषण आणि अपघातांची कारणे अभ्यासली असता प्रामुख्याने चारचाकी वाहन चालवत असताना वाहनचालकाने आणि सहप्रवाशाने सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे आणि दुचाकी वाहनचालक आणि सहप्रवाशी यांनी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे गंभीर किंवा प्राणांतिक अपघात झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.

लातूर जिह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अपघातग्रस्त कार, दुचाकी तसेच चक्काचूर झालेली वाहने मुद्दाम ठळकपणे ठेवण्यात आली आहेत. या वाहनांकडे पाहताच भीषण अपघाताचे वास्तव डोळ्यांसमोर उभे राहते. क्षणार्धात आयुष्य उद्ध्वस्त करणारा वेग, बेफिकीर वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष किती महागात पडू शकते याची जाणीव या वाहनांमधून होते. अनेक तरुण दुचाकी वा चारचाकी वाहन चालवताना वेगमर्यादा पाळत नाहीत. मोबाईलवर बोलणे, स्टंट करणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे किंवा सीटबेल्ट न लावणे या गोष्टी रोजच्याच झाल्या आहेत. मात्र एका चुकीमुळे केवळ वाहनच नाही तर, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते याचा विचार फार कमी जण करतात.

पोलीस प्रशासनाने राबविलेली ही मोहीम केवळ दंडात्मक कारवाईवर आधारित नाही, तर ती मानसिक परिणाम घडवणारी आहे. जेव्हा एखादा वाहनचालक रस्त्याच्या कडेला ठेवलेली पूर्णपणे चिरडलेली कार किंवा तुकडे झालेली दुचाकी पाहतो, तेव्हा त्याला स्वतच्या सुरक्षिततेची जाणीव होते.

लातूर पोलीस दलाने उचललेले हे पाऊल इतर जिह्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते. जनजागृतीसाठी पोस्टर, फलक किंवा भाषणांपेक्षा प्रत्यक्ष अपघातग्रस्त वाहनांचे प्रदर्शन अधिक प्रभावी ठरत आहे. रस्त्यावर ठेवलेली ती अपघातग्रस्त वाहने केवळ लोखंडाचे तुकडे नाहीत; ती अनेक कुटुंबांच्या वेदना, अश्रू आणि अपूर्ण स्वप्नांची साक्ष आहेत. त्या वाहनांकडे पाहून एक जरी वाहनचालक सावध झाला तर या मोहिमेचे खरे यश ठरेल.