
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा नंदुरबार येथे नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज (बुधवार) घडली. त्यांच्या पश्चात त्यांचे वडिल, आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
मुंबईत राहणाऱ्य़ा अनिकेत यांनी रुईया महाविद्यालयातून एमस्सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून 2011 पासून ते विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मुंबई महानगर मंत्री, कोंकण प्रांत मंत्री, राष्ट्रीय मीडिया सह-संयोजक, राष्ट्रीय मंत्री अशा विविध जबाबदाऱ्य़ा सांभाळत असताना अनेक आंदोलनांच्या माध्यमातून अनिकेत यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
विचारधारेला समर्पित अनिकेत विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सतत कार्यरत राहिले. महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीचे यशस्वी नेतृत्व अनिकेत ओव्हाळ यांनी केले आहे.






























































