पतंगाच्या मांजाने घेतला पोलीस कर्मचाऱ्याचा जीव, घटनेनं परिसरात हळहळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव (37) यांचे अपघाती निधन झाल्याची घटना समोर आली आहे. मांजाने गळा चिरल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच पोलीस विभागातही शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव हे आज त्यांचे कर्तव्य पूर्ण करून मोटारसायकलवरुन घरी निघाले होते. मात्र वाकोला ब्रिजवर आल्यावर त्यांच्या वाटेत पतंगाचा मांजा होता. तो त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकी थेट पुढे नेली. यात मांजा त्यांच्या गळ्याला लागला. यामुळे गळा चिरल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

त्यानंतर ही घटना त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आली. त्यांनी त्वरीत रुग्णालयात धाव घेतली. त्यांची परिस्थिती पाहताच त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. दरम्यान घटनेची माहिती कळताच सायन रुग्णालयात खेरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हजर झाले होते. तसेच दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक या ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आलेले होते.