दहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय यांच्यावतीने आयोजित हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरूवात झाली. स्पर्धेतील पहीले पुष्प अजिंक्यतारा थिएटर्स, गणेशगुळेच्या ‘अचानक’ या नाटकाच्या प्रयोगाने गुंफले.

अंजिक्यतारा थिएटर्स, गणेशगुळेने योगेश सोमण लिखित दशरथ रांगणकर दिग्दर्शित ‘अचानक’ हे नाटक उत्तमरित्या सादर केले. ग्रामीण भागातील कलाकारांना वरच्या दर्जाचं व्यासपीठ म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा होय. दहशतवाद आज आपल्या घरापर्यंत पोहचलाय हे सांगणार ‘अचानक’ हे नाटक प्रत्येक टप्यावर दहशतवादाच्या क्रुरवृत्तीची जाणीव नाटकातून होते.

राज चौधरी या मुस्लीम धर्म स्वीकारलेल्या बॅंक कर्मचाऱ्याच्या घरात दोन दहशतवादी घुसतात. राज यांची पत्नी राधा ही जन्माने ब्राम्हण आणि संघपरिवारातील आहे. त्यांना सरीन ही मुलगी आहे. अब्बास कुरेशी आणि आमीर हे दोघे दहशतवादी राज चौधरी यांच्या घरात घसून राजकडूनच एका मौलवीचा खून करण्याचा डाव रचतात. हे कृत्य राज यांनी करण्यासाठी मुलगी सरीन हीला ते दहशतवादी ओलीस ठेवतात. राधाच्या भूमिकेत रक्षिता पालव यांनी कसदार अभिनय केला. दशरथ रांगणकर यांनी दहशतवादाच्या दबावात जगणारा राज ताकदीने मांडला आहे. सरीनच्या भूमिकेला सुरेखा नाखरेकरने न्याय दिला. योगेश सोमण खणखणीत संवादाला नाट्यगृहातील ध्वनीयंत्रणेचा फटका बसला त्यामुळे त्या संवादाची मज्जा नाट्यप्रेमींना घेता आली नाही. दहशतवाद्याची भूमिकेत अब्बास कुरेशी अजय पानगले यांनी आणि अमीर महेश धावलकर यांनी बजावली. नाटकात अमीरला अब्बास गोळ्या घालून घरातच मारतो. अमीरचा मृतदेह अनेक दिवस घरात असतो अशा वेळी सरीनच्या किंकाळण्याचा आवाज एेकून काय झालं हे विचारायला येणाऱ्या शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास का येत नाही. दोन आतंकवादीनी घुसखोरी केल्याची बातमी टि. व्ही. वर येऊनही जेव्हा अब्बास आणि अमीर राजच्या घरातून बाहेर वावरतात तेव्हा त्याचा शेजाऱ्यांना संशय का येत नाही. राज चौधरी या पात्रातून हिदुस्थानात राहाणाऱ्या मुस्लीमांची दुसरी बाजू लेखकांनी मांडली आहे. दिग्दर्शकाने दहशतवाद्यांना थोडं वेगळ्या वेशभूषेत उभं करायला हवं होतं. कारण २६ नोव्हेंबरला हॉटेल ताज मध्ये घुसलेले दहशतवादी पर्यटकाच्या वेशभूषेत होते. त्यामुळे पारंपरिक वेशभूषेत दहशतवादी दाखविण्यापेक्षा तो संवादातून दहशतवादी दाखवायला हवा होता.