
सामना प्रतिनिधी । पुणे
पादचारी मार्गांवर गाड्या लावणारे आणि गाड्या चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पादचारी मार्गांवर गाडी लावणाऱ्या २ हजार ६७३ जणांवर कारवाई करून ४ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा, तर पादचारी मार्गांवरून गाडी चालविणाऱ्या १ हजार २७० जणांकडून २ लाख ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पादचारी मार्गांवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित रस्ता नाही. जीव मुठीत धरून रस्त्यावरून त्यांना जावे लागते. त्यामुळे अनेक छोटे- मोठे अपघात होऊन पादचारी जखमी होत आहेत. काहीजणांना प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्यावर पार्किंगसाठी जागा नसली की बेशिस्त वाहनचालक बिनधिक्कतपणे पादचारी मार्गांवर गाड्या लावून जात आहेत. तसेच, काही भागांत वाहतूककोंडी झाली की दुचाकी थेट पादचारी मार्गावरून घालून पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो.
पादचारी मार्गांचा वापर चालण्यापेक्षा दुचाकींसाठीच होत असून, याविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने टीकेची झोड उठवली जाते. पादचारी मार्गावर गाडी लावल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही ठराव झालेला आहे. याचा आधार घेत वाहतूक पोलिसांनी याविरोधात खास मोहीम सुरू केली आहे. २७ मे ते १७ जून या २० दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी पादचारी मार्गांवर गाडी लावणाऱ्या २ हजार ६७३ जणांकडून ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर पादचारी मार्गांवरून गाडी चालविणाऱ्या १ हजार २७० जणांवर कारवाई करून २ लाख ४० हजार ७०० रुपये दंड वसूल केला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. वाहनचालकांनी पादचारी मार्गांचा वापर करू नये, असे वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.
नेहरू रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीकडे दुर्लक्ष
ह स्वारगेटकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या नेहरू रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष करून पॉवर हाऊस ते टिंबर मार्केट यादरम्यान अनेक ठिकाणी पादचारी मार्गांवर गाड्या लावल्या जातात. तेथील वाहनविक्री करणाऱ्यांनी दुचाकी रस्त्यावरच लावून अतिक्रमण केले आहे. अनेकजण ‘नो-पार्किंग’मध्ये गाड्या लावून निघून जातात. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांकडून सोईस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने या भागात दिवसभर वाहतूककोंडी होत असते.






























































