भाजयुमोच्या सोलापूर जिल्हाध्यक्षासह चौघे तडीपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुनाचा प्रयत्न, धमकावणे, खंडणी मागणे, अवैध खासगी सावकारकी, घरफोडी, बेकायदेशीर जमाव जमविणे असे विविध गुन्हे दाखल असलेल्या चौघांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडीपार केले आहे. त्यामध्ये प्रकाश घोडके, मुकेश घोडके, बजरंग देवीदास जाधव, गोविंद उर्फ बाळू जाधव यांचा समावेश आहे. त्यातील प्रकाश घोडके हा भाजयुमोचा जिल्हाध्यक्ष आहे.

सोलापूर शहरातील सामाजिक सुरक्षितता व शांततेला धोका निर्माण करणाऱया चौघांना शहर पोलीस आयुक्तालयाने तडीपार केले. शहरातील दमाणी नगरासह अन्य ठिकाणी संबंधितांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नाही. प्रकाश घोडके व त्याचा भाऊ मुकेश घोडके यांच्यावर खुनाचा प्रयत्न, अवैध खासगी सावकारकी, अवैधरीत्या हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे, जाधव यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, बेकायदेशीररीत्या जमाव जमविणे, दंगल भडकावणे असे गुन्हे आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली. या चौघांना सोलापूर व धाराशिव जिल्हा आणि इंदापूर तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.