अभिनेता गौरव दीक्षितला एनसीबीने केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने गेल्या दोन दिवसांत मुंबई, नवी मुंबई, नालासोपारा येथे धडक कारवाई करून अभिनेता गौरव दीक्षितसह सहा जणांना अटक केली. ड्रग्ज केसमध्ये गौरवला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

एनसीबीने गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने गेल्या काही दिवसांत सहा ठिकाणी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी एनसीबीने अंधेरी परिसरातून ड्रग्ज तस्कर शादाब बटाटाला अटक केली होती. त्याच्या चौकशीत अभिनेता अजाज खानचे नाव आले होते. एनसीबीने अजाज खानचीदेखील चौकशी केली होती. अजाजच्या चौकशीत गौरवचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने गौरवच्या घरी छापा टापून काही प्रमाणात एमडी आणि चरस जप्त केले होते. कारवाईपूर्वीच गौरव हा पळून गेला होता. त्याला एनसीबीचे अधिकारी शोधत होते. अखेर शुक्रवारी गौरवला एनसीबीने अंधेरी परिसरातून अटक केली. अजाज आणि गौरव हे दोघे शादाबकडून ड्रग्ज घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

एनसीबीचे दोन अधिकारी झाले जखमी
नवी मुंबईच्या खारघर परिसरात ड्रग्ज तस्करी करणाऱया किंग्सले उकवुझाची माहिती एनसीबीला मिळाली. शुक्रवारी पहाटेच एनसीबीचे पथक खारघर परिसरात गेले. तेथून किंग्सलेला एनसीबीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून काही प्रमाणात गांजा जप्त केला आहे. किंग्सलेला एनसीबीने अटक केल्याची माहिती समजताच नायजेरियनच्या खारघर येथील कम्युनिटी किचन जवळ 50 जण आले. तेव्हा नायजेरियन आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन एनसीबीचे अधिकारी जखमी झाले आहेत.