आर. माधवनच्या मुलाची सोनेरी कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता आर. माधवन याचा मुलगा वेदांत याने हिंदुस्थानींची मान अभिमानाने उंचावली आहे. कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये पुरुषांच्या 800 मीटर फ्री स्टाईल स्विमिंग स्पर्धेत वेदांतने सुवर्णपदक पटकावले आहे. खुद्द आर. माधवन याने सुवर्णपदक सोहळ्याचा व्हिडिओ पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली.

‘सुवर्णपदक…तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने विजयाचा हा प्रवास सुरूच आहे. आज 800 मीटरमध्ये वेदांतने सुवर्णपदक पटकावले आहे. या विजयाने मी भारावलो आहे. प्रशिक्षक प्रदीप सर, स्विमिंग फेडरेशन आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार,’ अशा शब्दांत आर. माधवनने आपला आनंद व्यक्त केला आहे. वेदांतच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 वेदांत माधवन हा 2026 च्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. हिंदुस्थानात मोठ्या आकाराच्या जलतरण तलावांची कमतरता आहे. त्यातच कोरोनामुळे बंद असलेल्या जलतरण तलावामुळे वेदांतच्या सरावात अडथळा निर्माण होत होता. याच कारणामुळे आर. माधवन याने आपल्या करीअरची पर्वा न करता मुलासाठी दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तिथेच वेदांतचे प्रशिक्षण सुरू आहे.