संयम सुटला तर ‘मायबाप’ वगैरे विसरून जाऊ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

नाटक म्हणजे मराठी माणसाची ओळख, मराठी माणसाचा प्राण.  खिशाला चाट लावून तन्मयतेने नाटक बघणाऱ्या  प्रेक्षकांमुळे रंगभूमी उभी आहे. मात्र काही बेशिस्त प्रेक्षकांमुळे या रसिकतेला गालबोट लागत आहे. नाटक सुरू असताना मोबाईलची रिंग वाजणे, मोबाईलवर मोठय़ाने बोलून व्यत्यय आणणे असे प्रकार प्रेक्षक करतात. वारंवार विनंती करूनही काही प्रेक्षकांचा बेजबाबदारपणा कमी होताना दिसत नाही. प्रेक्षकांच्या या बेशिस्त वर्तनामुळे कलाकार चिडले आहेत. कलाकारांचा अपमान करण्यासाठी नाटय़गृहात येता का, असा सवाल करून प्रेक्षकांची ‘नाटकं’ थांबली पाहिजेत अन्यथा नाटक बंद, असा पवित्राच कलाकारांनी घेतला आहे.

नाटक सुरू असताना काही प्रेक्षकांकडून नाटकाचा रसभंग होत असल्याच्या घटना वरचेवर घडत आहेत. मोबाईल, वेफर्स, लहान मुलांचे रडणे आणि आतबाहेर करून थिएटरच्या दरवाजाची आदळआपट करणे अशा गोष्टी प्रेक्षकांकडून होतात. नाटकं सुरू होण्यापूर्वी कलाकारांकडून मोबाईल फोन बंद करा, अशा सूचना वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रेक्षकांच्या अशा वागण्यामुळे कलाकार मंडळींचा संयम सुटला आहे.

आज सुमितने नाशिकच्या प्रयोगादरम्यान नेमकं काय घडलं, याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली. नाटकाचं तिकीट काढलं म्हणजे तुम्ही आम्हाला विकत घेतलं का? का म्हणून करावं आम्ही नाटक? हा अपमान करून घेण्याकरिता? म्हणजे एकीकडे नाटय़गृहांची दुरवस्था आहेच, तशा बकाल नाटय़गृहात काम करा वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरीत्या असा अपमान सहन करा, असे सुमितने लिहिले आहे.

सुमित राघवन याने लिहलेली फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे आहे

घडलं असं,वेगवेगळ्या लोकांचा मोबाईल वाजला त्या प्रयोगाला. प्लस एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत बाहेर केलं,तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही पण ते दार दर वेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा,पुढे एक वयस्कर बाई दुस-या बाईला “अहो हळू बोला” असं बोलली,त्यावर‌ ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर एकू येत होतं आणि शेवटी एका पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं.

नाशिकच्याच एका प्रयोगाला,”एक शून्य तीन” नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि फोन वाजला एका प्रेक्षकाचा. तर तो बोलू लागला फोन वर,मी आणि Swanandi Tikekar स्टेजवर होतो. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तिकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशा-याने “तुमचं चालू द्या” असं केलं आणि मी स्तब्ध झालो. तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला?


का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करून घेण्याकरता? म्हणजे एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच,तशा बकाल नाट्यगृहात काम करा वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा.

प्रयोग थांबवणेच योग्य – संजय मोने

प्रेक्षकांच्या मोबाईलला कंटाळून सुमितने नाटक बंद करण्याची केलेली कृती ही 100 टक्के बरोबर आहे. माझ्या नाटकाला असा प्रकार घडला तर मी प्रयोग थांबवतो आणि पुन्हा सुरू करत नाही.  कलावंत मंडळी एक विचार घेऊन रंगमंचावर येतात, कलाकृती सादर करतात त्यांना गृहीत धरू नका.

मोबाईल मॅनर्स शिका – अजित भुरे

प्रेक्षकांनी  मोबाईल मॅनर्स शिकणे ही काळाची गरज आहे. कलाकार रक्ताचं पाणी करून काम करतात,  तेव्हा त्यांच्या कामात व्यत्यय आणू नये याचे भान सुजाण प्रेक्षकाला असले पाहिजे. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान आम्ही सुजाण प्रेक्षक हा उपक्रमच राबवला. आम्ही नाटकाचे मध्यंतर झाल्यानंतर  प्रेक्षकांशी संवाद साधायचो. एकही मोबाईल नाटय़गृहात नाटकादरम्यान वाजला नाही की आम्ही  प्रेक्षकांना पारितोषिक द्यायचो. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

नाटय़गृहात मोबाईल जॅमर हवेत- चिन्मय मांडलेकर

सिविक सेन्स हा प्रकारच नाही. ज्याप्रमाणे कोर्टात गेलात की तुम्ही मोबाईल फोन बंद ठेवता. कारण तिथे कायद्याचा बडगा आहे. कोर्टात फोन वाजला की तो जप्त होतो हे तुम्हाला माहीत असतं. म्हणून नाटय़गृहाच्या बाबत जॅमरसारखी कडक पावले उचलली पाहिजेत.

संयम सुटल्यावर असे होणारच- लीना भागवत

फक्त बोलणारेच नव्हेत तर प्रवेशादरम्यानच्या ब्लॅकआऊटमध्ये मोबाईलचा लाइट पेटवणारेही प्रेक्षकही असतात. त्यांना कलाकारांच्या एकाग्रतेशी काही देणंघेणं नसतं. आम्ही बॅकस्टेजच्या कर्मचाऱ्यांनाही प्रयोग सुरू असताना इकडेतिकडे फिरू नका, लगेच सामानाची आवराआवर करू नका, असे सांगतो. मला खात्री आहे की सोमवारी सुमितने जे काही केलं ते एका फटक्यात केलेलं नसेल. वारंवार विनंती करून प्रेक्षक ऐकत नसतील तर संयम सुटणारच. प्रेक्षक स्वत:साठी अडीच तास काढू शकत नाहीत का?

संजय मोने

आम्ही संयम बाळगतो, काही बोलत नाही तोपर्यंत ठीक आहे. मायबाप प्रेक्षक वगैरेचा काळ वेगळा होता. आज मनोरंजनाची साधनं उपलब्ध आहेत. ज्यांना व्यवस्थित नाटक बघायचं आहे त्यांनीच नाटकाला यावं.

चिन्मय

सुशिक्षित प्रेक्षक असे नॉनसेन्स वागतात. नाटकाची वाट लावायची असेल तर नाटकाला येऊच नका. अति झालंय… आम्हा कलाकारांचा संयम सुटणार नाही तर काय?

सुप्रिया विनोद

थोडय़ा बेशिस्त प्रेक्षकांमुळे सर्वांना त्रास होतो. अशा बेजबाबदार प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की, जर तुम्हाला एखाद्या कलाकृतीचे महत्त्व वाटत नसेल, आवडत नसेल तर तिथून निघून जावं. इतरांचा रसभंग करू नये.