3 वर्षाची असताना झाले लैंगिक शोषण, ‘कास्टिंग काऊच’चाही केला सामना; ‘दंगल गर्ल’चा गौप्यस्फोट

‘दंगल गर्ल’ अभिनेत्री फातिमा सना शेख हिला बॉलिवूडमध्ये बस्तान बसवून थोडाच काळ उलटला आहे. मात्र या काळातही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर खास स्थान बनवले आहे. आगामी काळात ती ‘लुडो’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’ सारख्या बड्या चित्रपटात दिसणार आहे. याच दरम्यान, तिने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या जीवनातील संघर्ष लोकांसमोर मांडला.

‘जीवनात मी अनेक समस्यांचा सामना केला. 3 वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते, असा गौप्यस्फोट फातिमा हिने केला.

महिला याबाबत जास्त बोलताना दिसत नाहीत. त्या याला आपल्यावरील कलंक समजतात. मात्र आता जमाना बदललाय. लैंगिक शोषणबाबत हिंदुस्थान आणि जगभरात जागरूकता वाढली आहे. मात्र पूर्वी याबाबत बोलणे देखील चुकीचे समजले जायचे, असेही ती म्हणाली.

बॉलिवूडमधील कास्टिंग काऊच बाबत बोलताना ती म्हणाली की, मी देखील कास्टिंग काऊचचा सामना केलाय. एक वेळ अशी आली होती की सेक्स केल्याशिवाय काम मिळणार नाही असेही ऐकावे लागले. यामुळे अनेक चांगल्या संधी माझ्या हातून निसटल्या. अनेकदा कोणीतरी तडजोड करून, रेफरन्स मिळवून जागा पटकवायचे आणि चित्रपटाचा भाग असतानाही मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात यायचा, असा खुलासा फातिमा हिने केला.

दरम्यान, फातिमा गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूडचा भाग असून तिने अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. ‘इश्क’, ‘चाची 420’, ‘वन टू का फोर’ आणि ‘बडे दिलवाले’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून ती दिसली आहे. तसेच अमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात आणि त्यानंतर आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्थान’मध्येही ती दिसली.

आपली प्रतिक्रिया द्या