फॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर

बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या वेब सीरिजमुळे अभिनेत्री अदिती पोहनकर चर्चेत आली आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच अदितीने निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा अशा दिग्गज दिग्दर्शकासोबत काम केले आहे. मातृभाषा मराठी असल्याचा मला अभिमान असून मराठीमध्ये भविष्यात ‘एक हजाराची नोट’, ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’ सारखे सिनेमे करायला आवडतील, अशी इच्छा तिने मुलाखतीत व्यक्त केली आहे.

प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही वेबसीरिज सध्या गाजतेय. यात अदितीने साकारलेल्या पम्मी या भूमिकेचे खूप कौतुक होतेय. भूमिकेचा आव्हानाबाबत अदिती म्हणाली, ‘पम्मी ही कुस्तीपटू आहे. माझा लुक ग्लॅमरस असल्याने कुस्तीपटूसारखे दिसणे माझ्यापुढे आव्हान होते, असे ती सांगते. या भूमिकेसाठी तिने चार महिने शारीरिक कसरत करत, विशेष मेहनत घेतली होती. त्यानंतर काही दिवस संग्राम सिंह यांच्याकडून कुस्तीचे धडे गिरवले, असेही तिने सांगितले.

अदितीच्या ‘लई भारी’ चित्रपटाला तुफान यश मिळूनही ती पुन्हा मराठी चित्रपटात झळकली नाही. याबाबत ती म्हणाली, ‘लई भारी’ नंतर मी एक मराठी चित्रपट केला होता. पण काही कारणास्तव तो रिलीज झाला नाही.’

मधल्या काळात अदितीने दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंदी वेबसिरीज केल्या. ‘स्क्रिप्ट चांगली असेल तर कोणत्याही भाषेत चित्रपट करण्याची माझी तयारी आहे. अर्थातच मातृभाषा असल्याने मराठीला माझे पहिले प्राधान्य असेल’, असेही तिने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या