वनखात्याचे नाव बदला, शिकारखाते ठेवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘अवनी’ वाघिणीला वन खात्याने शार्पशूटरकडून ठार मारल्यामुळे प्राणिप्रेमी आणि सोशल मीडियातून प्रचंड संताप व्यक्त होत असताना शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील वन खात्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता वन खात्याचे नाव बदलून ‘शिकारी’ खाते करायला हवे, असा सणसणीत टोलाही त्यांनी ट्विटरवरून लगावला आहे.

‘अवनी’ला थेट गोळी घालण्याऐवजी बेशुद्ध का केले नाही, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘आज एका वाघिणीचा बळी घेतला. उद्या तिच्या बछडय़ांचा किंवा इतर वाघांचाही बळी घेतला जाईल’, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘अवनी’ला ठार मारण्याच्या सरकारच्या भूमिकेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार सध्या प्राणी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. पाच कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मग अशी वन्य प्राण्याला मारण्याची वेळ का येते, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या या कृत्यावरून लोक तरी कुठला आदर्श घेणार, असा रोखठोक सवालही त्यांनी केला आहे.

प्राणी-मानवातील संघर्ष हाताळा
वन्य प्राणी आणि मानव यातील संघर्ष पूर्वापार आणि जगभरात चालत आला आहे. तो टाळताही येणार नाही, मात्र हा संघर्ष प्राण्यांची हत्या करून नव्हे तर योग्य समन्वय साधून टाळला पाहिजे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वाघांची संख्या आधीच कमी होत आहे. ते दिसेनासे होत असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त करतानाच सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे.

वन खात्याला प्रश्न…
‘अवनी’ला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली होती का, यामुळे वन्य जीव हत्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाले आहे का?
‘अवनी’ला बेशुद्ध करणे शक्य नव्हते का. गोळी घालून मारल्याचे जाहीर केले असताना तिच्या मानेला डार्ट का लावला?
माणसांना जंगलातील वाघांची भीती आहे, मग घरात स्वच्छतागृहे, शेतांना संरक्षक भिंती बांधल्या का?
वाघापासून बचावासाठी काय उपाययोजना केल्या, वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांना काय मदत केली!

अवनीची हत्या कुठे झाली?
गेल्या दोन वर्षांत अवनी वाघिणीने 13 जणांचा बळी घेतला होता. तिला दहा महिन्यांचे दोन बछडे आहेत. शुक्रवारी रात्री यवतमाळच्या बोराटी जंगलात तिला खासगी शार्पशूटरने ठार केले. त्यानंतर देशभरातील वन्यजीव प्रेमींमधून या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अवनीला लगेच मारण्यात आले नाही, तिच्या अनाथ बछडय़ांसमोर वेदनेने तडफडताना आणि रक्ताच्या थारोळय़ात ती हळूहळू मरण पावली म्हणूनच हा वन्यजीव गुन्हा होतो, असे ‘पेटा’चे प्रमुख मित अशर यानी सांगितले.

नागपूरची मदत नाकारली, हैदराबादला कंत्राट दिले!
राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांनी अवनीला जेरबंद करण्यासाठी नागपूरची मदत नाकारून हैदराबादला कंत्राट दिल्याचे आता उघड झाले आहे. नागपूर जिल्हा रायफल असोसिएशनने 12 सप्टेंबर रोजी मुख्य वनसंरक्षकांना पत्र लिहून याकामी मदत करण्याची तयारी दर्शवली होती. 2007 मध्ये ब्रह्मपुरी भागात असोसिएशनने पोलीस पथकाला मदत केली होती. असोसिएशनमध्ये राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज सदस्य असून अवनीला बेशुद्ध करण्यासाठी आम्ही विनामोबदला सहकार्य करण्यास तयार आहोत असे पत्र सेक्रेटरी सी. के. देशमुख यांनी दिले होते. मात्र ही ऑफर धुडकावून वनखात्याने हैदराबादहून शार्पशूटर बोलावल्याचे उघड झाले आहे.

summary-aditya thackeray slams forest department