
विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढविण्यासाठी लागणारा अभ्यासक्रम निर्माण करण्याची गरज आहे. देशात सध्या राईट टू एज्युकेशन आहे. मात्र, राईट टू क्वॉलिटी एज्युकेशनसाठी आपला फोकस हवा. शिक्षणाचा गुणवत्तापूर्ण दर्जा प्रस्थापित करून शिक्षणातून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे मत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हडपसर येथील अमनोरा टाऊनशिपमधील छत्रभूज नरसी या आयबी व केंब्रिज पॅटर्न असलेल्या शाळेचे भूमिपूजन पार पडले, यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. याप्रसंगी अमनोरा सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, नरसी मोनजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त जयराज ठक्कर, हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार असावा, या संकल्पनेवर काम करणे महत्त्वाचे आहे. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहात असताना केवळ शिक्षण नव्हे तर मुलांमधील उत्सुकतेला योग्य मार्ग उपलब्ध करून देत त्यांच्या नवसंकल्पनांना व्यासपीठ देणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात मागील 8 महिन्यांनंतर मी कोरोना सेंटर सोडून कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीच्या उद्घाटनाला आलो आहे. माझ्यासाठी ही आशादायक बाब असून, भविष्यात ही आशा कायम राहील, असा विश्वास आहे.’
शरद पवार म्हणाले, ‘कोरोनानंतर आता नजीकच्या भविष्यात शाळांमध्ये असणाऱया सोयी-सुविधांमध्ये काही प्रमाणात बदल होणार आहेत हे गृहीत धरून आपण सर्वांनीच तयार राहायला हवे. एज्युकेशन हब असलेले पुणे वेगाने पुढे जात असून, आयटी, ऑटोमोबाईल सेक्टर म्हणून नावारूपाला येत आहे.’ यावेळी आमदार तुपे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
‘विद्यापीठा’शेजारी बसल्याचा आनंद
आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शाळेच्या भूमिपूजनाला आलो. मात्र, आपण येथे मला ‘विद्यापीठा’च्या बाजूला बसविले. पवार साहेबांकडून काही ना काही शिकायला मिळते, असे म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.





























































