‘सुप्रशासना’वरील संशोधनाला आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मानाचे पान, उत्तम प्रशासनाची 51 वैशिष्टय़े

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

नस्ती-फायली, प्रस्ताव, शासन आदेश सततच्या बैठका अशा सरकारी कामाच्या धबडग्यात अनेक हुशार सरकारी अधिकारी अडकून पडतात. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा अनेकदा इतरांना होत नाही. पण दररोजच्या कामाचा व्याप सांभाळत राज्याच्या प्रशासकीय सेवेतील एका उपजिल्हाधिकाऱयाचे सुप्रशासनावर आधारित संशोधनपर लिखाण आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या लिखाणाचा उपयोग राज्यातील वीस लाखांहून अधिक कर्मचारी व अधिकाऱयांना होणार आहे.

उपजिल्हाधिकारी राजू नंदकर सध्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करीत आहेत. ‘सुशासनाच्या प्रभावी आणि कार्यक्षम अंमलबजावणीसाठी महत्त्वाची वैशिष्टय़े आणि मुख्य घटक’ या विषयावरील त्यांचे संशोधनपर लिखाण ‘जर्नल ऑफ गुड गर्व्हन्सन्स ऍण्ड संटेनेबल डेव्हलपमेंट इन दी अफ्रिका’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

या संशोधनपर लिखाणात त्यांनी सुप्रशासनाची 51 वैशिष्टय़े नमूद केली आहेत. यामध्ये कार्यक्षम प्रशासन, सर्वसमावेशक प्रशासन, सहभागी प्रशासन, समान न्याय, पारदर्शकता, उत्तरदायित्व, निर्णय क्षमता, टीमवर्क, नैराश्य व चिंता, इतरांचे ऐका, लोकसेवा हक्क अधिनियम, अंमलबजावणी, माहिती अधिकार, न्यायालयीन कामकाज, झीरोपेडन्सी, दौरे, कार्यालयीन स्वच्छता, संवाद कौशल्य, विसंवाद, जनसंपर्क, शासन निर्णय, वेळेचे व्यवस्थापन, कार्यालयीन शिस्त व वर्तवणूक, इतर विभाग समन्वय आदींचा समावेश आहे.

या संशोधनात त्यांनी सुप्रशासन राबवण्यासाठी 51 बाबींवर काम होणे कसे गरजेचे आहे याबाबत स्वतःच्या अनुभवनातून सखोल लिखाण केले आहे. शासकीय कर्मचाऱयांनी सुप्रशासन कसे राबवावे याचा ऊहापोह या संशोधनपर लिखाणात केला आहे.

सुयोग्य नियोजन व अंमलबजावणी प्रशासनातील प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱयाने केली तर अधिक कार्यक्रम पारदर्शक लोकाभिमुख व जबाबदार सुप्रशासन अस्तित्वात येईल.