मोरोक्कोची सिंहगर्जना, उपांत्य फेरीत धडक मारणारा पहिला आफ्रिकन संघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आफ्रिकन मोरोक्कोच्या ‘सिंह गर्जने’मुळे आज युरोपियन पोर्तुगालच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याच्या स्वप्नांचा  चुराडा झाला. सामन्यातील 75 टक्के चेंडूंवर पोर्तुगालचे नियंत्रण असूनही मिळालेल्या संधीचे गोल न झाल्यामुळे त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच ‘गार’ झाले आणि युसेफ एन नसिरीच्या एकमेव हेडरने मोरोक्कोला उपांत्य फेरीत पोहोचविण्याचा पराक्रम केला. फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात उपांत्य फेरीत प्रवेश करणारा मोरोक्को हा पहिलाच आफ्रिकन संघ ठरला आहे. मोरोक्कोने या विजयासह स्पर्धेत अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली.

फुटबॉलचा सुपरस्टार ख्रिस्तीआनो रोनाल्डो पुन्हा एकदा आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात अपयशी ठरला. गेल्या चार स्पर्धांमध्ये एकदाही पोर्तुगालचा संघ अंतिम चार संघांत स्थान मिळवू शकलेला नाही. आज पोर्तुगालने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला जोआओ फेलिक्सचा हेडर मोरोक्कन गोलरक्षक बोनोला चकवण्यात थोडक्यात चुकला. 13 व्या मिनिटाला पुन्हा एकदा फर्नांडेझ-गरेरोचे प्रयत्न तोकडे पडले. एकीकडे पोर्तुगालचे जोरदार प्रयत्न कमी पडत होते, दुसरीकडे मोरोक्कनही गोलजाळ्यापर्यंत चेंडू घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते. गोल करण्याच्या धडपडीत दियागो कोस्टाने नसरीला गोल करण्याची सुवर्णसंधी भेट दिली. अनपेक्षितपणे युसेफ एन नसरीचा हेडर गोल ठरला आणि मोरोक्कोने सामन्यात आघाडी घेतली. 42 व्या मिनिटाला झालेला गोल मोरोक्कोला उपांत्य फेरीत घेऊन गेला. 45 व्या मिनिटालाच पोर्तुगालला बरोबरीची संधी होती, पण फर्नांडेझचा तो शॉट गोलबारवर आदळला.

हाफटाइममध्ये घेतलेली आघाडी मोरोक्कोने शेवटपर्यंत कायम राखली. पण फर्नांडेझच्या अप्रतिम फटक्यांचे दुर्दैव होते की त्यांना गोलचे भाग्य लाभले नाही. हाफटाइमनंतर पोर्तुगालचे वादळ मोरोक्कन गोलपोस्टजवळ धडकले, पण त्यांना गोलजाळ्यात पोहोचताच आले नाही. सामना संपता संपता पेपेच्या हेडरवरही पोर्तुगालने जवळजवळ बरोबरी साधली होती, पण तोसुद्धा गोल चुकला आणि मोरोक्कोची गर्जना वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडकली.