
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर काशी आणि मथुरेसह सर्व तीर्थक्षेत्रे ‘आळस झटकताना’ दिसत आहेत आणि अशा परिस्थितीत सर्वांनाच पुन्हा एकदा पुढे यावे लागेल’, असं आवाहन केलं आहे. ‘अटल बिहारी वाजपेयी सायंटिफिक कन्व्हेन्शन सेंटर’ येथे भाजपच्या एकदिवसीय राज्य कार्यसमितीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना त्यांनी दावा केला की, ‘अयोध्येतीलभव्य श्री राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्यानंतर आता काशीने आळस झटकण्यास सुरुवात केली आहे. काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनानंतर काशीत दर्शनासाठी दररोज एक लाख भाविक पोहोचत आहेत.’
ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार काशी आपल्या आपल्या नावाला साजेसे काम करत आहे आणि मथुरा, वृंदावन, विंध्यवासिनी धाम, नैमिष धाम यांसारखी सर्व तीर्थक्षेत्रे आळेपिळे देत आळस झटकून तयार होत असल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी पुन्हा एकदा पुढे यायला हवं आहे. अलविदाच्या दिवशी रस्त्यांवर नमाज पठण झालं नसल्याचं चित्र उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. तसंच भोंगे उतरवल्यानं अनावश्यक गोंगाटातून तुमची सुटका कशी झाली हे तुम्ही पाहिलंच असेल’, असंही ते म्हणाले.
नव्या हिंदुस्थानचा नवा उत्तर प्रदेश तयार आहे, जो देश आणि जगासमोर ठामपणे येत आहे. 2024 च्या लोकसभेच्या तयारीला आतापासूनच लागायचं आहे. पुन्हा एकदा 75 हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्याचे लक्ष्य घेऊन पुढं जायचं आहे, असं आवाह त्यांनी यावेळी केलं आहे.
पक्षाच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले निकाल मिळाले आहेत, त्यामुळे आम्हाला आतापासून 2024 साठी पुढे जायचे आहे.’ त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे, त्यामुळे 75 लोकसभा जागांचे लक्ष्य घेऊन पुढं जावं लागणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत ज्यात 2014 च्या निवडणुकीत भाजपने 71 जागा जिंकल्या होत्या आणि मित्रपक्ष अपना दलाने दोन जागा जिंकल्या होत्या, तर 2019 च्या निवडणुकीत भाजपला 62 आणि सहयोगी अपना दल (एस) ला दोन जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील यशाची आठवण करून देताना ते म्हणाले, या यशानंतर आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांच्या अथक परिश्रमानं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व समज, षड्यंत्रे फेकून देत 37 वर्षांनंतर भाजपनं उत्तर प्रदेशात पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळवलं आहे.
विरोधी पक्षांवर तोंडसुख घेत मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या आधीच्या सरकारांनी अविश्वासाची स्थिती निर्माण केली होती, राज्याबाबत जगात जी धारणा निर्माण झाली होती, ती गेल्या पाच वर्षांत बदलली आहे. पुढे ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात षड्यंत्र रचून खंडित जनादेश आणून लूट व्यवस्थेला चालना देण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. ‘गेल्या विधानसभा निवडणुकीतील हा जनादेश अगदी स्पष्टपणे दर्शवतो की, तुम्ही जर गाव, गरीब, शेतकरी, तरुण, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रामाणिकपणे काम करत असाल तर जनता जनार्दनही जात, धर्म, धर्म, प्रदेश भाषा यासगळ्यांच्या वर उठून तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभी असलेली दिसेल.
याआधी उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकारिणीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.



























































