घर खरेदीनंतर आता वीज बिल नावावर करण्याचे नो टेन्शन

जुने घर खरेदी केल्यानंतर त्याचे वीज बिल नावावार करणे म्हणजे मोठे दिव्याचे काम. महावितरणच्या वेगवेगळय़ा कार्यालयांत खेटे घालूनही ते वेळेत न झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र आता महावितरणच्या ‘इझ ऑफ लिव्हिंग’ उपक्रमांतर्गत घर खरेदीनंतर सदरचे वीज बिल जुन्या मालकाच्या नावावरून नवीन खरेदीदाराच्या नावावर सहजपणे माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे होणार आहे. त्यासाठी कोणताही अर्ज करण्याची किंवा प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही.

एखाद्या व्यक्तीने जुने घर किंवा दुकान खरेदीनंतर मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर करण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर पंपनीच्या कर्मचाऱयांकडून पडताळणी केली जात असे. या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात असल्याने ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता. मात्र आता नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की महावितरणला संदेश पाठविला जातो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाइनही भरू शकतो. फी भरली की विजेचे बिल नावावर होत असल्याने ग्राहकांची फरफट थांबणार आहे.

कागदपत्रांमधून सुटका

नव्या प्रक्रियेत वीज बील नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.