कोरोनानंतरही संगमनेरमध्ये बससेवा ठप्पच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये जाणारी बस सेवा बंद आहे, तर काही गावांमधील बसफेऱया कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील

शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही संगमनेर बस आगाराकडून कुठलीही सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व बससेवा पूर्ववत केली नाही तर संगमनेर बसस्थानकाच्या आगार प्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा छात्रभारती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

कोरोनानंतर संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील बस बंद केल्या आहेत. याबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आगारप्रमुखांना वेळोवेळी निवेदन दिले आहे. याबाबत आंदोलनही केले आहे. तसेच सातत्याने संवाद साधला जात असतानाही सतत उडवाउडवीची उत्तरे, खोटी आश्वासने दिली जात आहेत. अनेक ठिकाणी पूर्वी सुरू असलेल्या बस बंद केल्या आहेत. यामुळे हजारो मुला-मुलींचे शिक्षण बंद झाले आहे. विद्यार्थ्यांना बस पासचा लाभ घेता येत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागत आहे. अनेक मुलांना जीव धोक्यात घालून खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.

बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी राहावे लागत आहे. मेस व रूमसाठी नाहक पैसे मोजावे लागत आहेत. पठार भागासह अनेक गावांतील फेऱया मोठय़ा प्रमाणात बंद केल्या आहेत. बऱयाचदा अचानक गाडय़ांच्या फेऱया रद्द केल्या जातात. त्यामुळे पठार भाग व संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील ठिकाणच्या मुक्कामी बसेस तसेच शाळेच्या वेळेतील बसेस तत्काळ चालू कराव्यात; अन्यथा आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा छात्रभारती संघटनेने आगारप्रमुखांना दिला आहे. यावेळी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सदस्य गणेश जोंधळे, ओंकार अभंग, सुमित खरात, साहिल खरात, पृथ्वीराज खरात, विशाल जगताप, अवजीनाथ गायकवाड, सिद्धांत धाकतोडे, रूपाली घुले, मनीष फटांगरे, राणी घुले, अनुष्का घुले आदी उपस्थित होते.