लेखी परीक्षेनंतर होणार बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकेतर कर्मचाऱयांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला असून त्याचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसला आहे. बारावीची लेखी परीक्षा तोंडावर आली तरी असंख्य महाविद्यालयांतील प्रॅक्टिकल परीक्षा उरकलेल्या नाहीत. त्यामुळे अशा महाविद्यालयांनी बारावीच्या लेखी परीक्षेनंतर आऊट ऑफ टर्न पद्धतीनुसार शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा घ्यायच्या आहेत.

आऊट ऑफ टर्न पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधून लेखी परीक्षेनंतर नियोजन करावे, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. बारावीच्या लेखी परीक्षेला आठवडा शिल्लक असतानाही अनेक महाविद्यालयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा न झाल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशिवाय परीक्षा घेण्यास महाविद्यालयांना अडचणी येत आहेत.

मुंबईतील महाविद्यालयांनी काही दिवसांपूर्वी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडे शिक्षकेतर कर्मचाऱयांअभावी परीक्षा घेण्यास अडचणी येत असून कर्मचाऱयांच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप तरी शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यासाठी फक्त तीन दिवस

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. महाविद्यालयांनी प्रॅक्टिकल परीक्षा 16 फेब्रुवारीपर्यंत घेणे अपेक्षित होते. मात्र अनेक महाविद्यालयांना या प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यास शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे अडचणी येत आहेत.

मुंबई विभागात बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा रखडल्या आहेत, याविषयी अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचे नियोजन कनिष्ठ महाविद्यालय आणि विभागीय शिक्षण मंडळाने करायचे आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयात प्रॅक्टिकल परीक्षा झालेली नसेल तर अशी महाविद्यालये लेखी परीक्षेनंतर प्रॅक्टिकल परीक्षा घेऊन शकतात. याला आऊट ऑफ टर्न पद्धत असे म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा झालेल्या नाहीत तर त्या लेखी परीक्षेनंतर होतील. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही.

 अनुराधा ओक, सचिव,

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ