
फुटबॉल जगताला यंदा नवा जगज्जेता लाभेल अशी अपेक्षा होती, पण दोन माजी जगज्जेत्यांनी नव्या जगज्जेत्यांची स्वप्नं उपांत्य फेरीतच उद्ध्वस्त केली. 2010 साली स्पेनच्या रुपाने फुटबॉलला नवा जगज्जेता लाभला होता. त्यानंतर गतवर्षी क्रोएशियाला ती संधी होती, पण फ्रान्सने ती पूर्ण होऊ दिली नाही. त्यामुळे आता नव जगज्जेत्यासाठी अमेरिकेची वाट पाहावी लागेल.
यावेळी मोरोक्को आणि क्रोएशियाची भन्नाट कामगिरी पाहाता यापैकी किमान एक संघ तरी अंतिम फेरीत धडक मारेल असे चित्र होते, पण ते चित्र आता फाटले गेले आहे. अर्जेंटिनाने क्रोएशियाचे आव्हान संपुष्टात आणले तर मोरोक्कोला फ्रान्सने रोखले. 1982 साली 24 संघ झाल्यापासून फुटबॉलच्या थरारात वाढ झाली. त्यानंतर फुटबॉलचे जेतेपद बलाढय़ संघच आळीपाळीने जिंकत होते. हा प्रकार 1998 सालापर्यंत सुरू होता. जसे अर्जेंटिनाला जगज्जेतेपदासाठी 48 वर्षे वाट पाहावी लागली, तशीच दीर्घ प्रतीक्षा फ्रान्सलाही करावी लागली. त्यांनी 68 वर्षांच्यी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 1998 साली सर्वप्रथम अंतिम फेरी गाठली. त्याच वर्षी जगज्जेतेपद जिंकले आणि फुटबॉलचा नवा जगज्जेता झाला. त्यानंतर हा करिश्मा स्पेनने करून दाखविला. स्पेनला तब्बल 76 वर्षांनंतर 2010 साली अंतिम फेरी गाठण्यात यश लाभले. तोसुद्धा नवा जगज्जेता होता. 1934 पासून वर्ल्ड कप खेळत असलेला नेदरलॅण्ड्स आतापर्यंत तीनवेळा फायनलमध्ये हरलाय, गेल्या वर्षी क्रोएशियाला नवा जगज्जेता होण्याची संधी होती, पण तेसुद्धा उपविजेतेच ठरले.
एकदाही जगज्जेते नाही
वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारूनही झेकोस्लोव्हाकिया, नेदरलॅण्ड्स, हंगेरी, स्वीडन आणि क्रोएशिया हे सहा संघ अद्यापही जगज्जेते झालेले नाहीत. यात नेदरलॅण्ड्स चक्क तीनदा अंतिम फेरीत पोहोचलाय, पण तिन्ही वेळेला त्यांना पराभवाचीच चव चाखावी लागली आहे. त्याचप्रमाणे फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात युरोपियन आणि लॅटिन संघ वगळता एकाही आशियाई किंवा आफ्रिकन संघाला अजूनही अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आलेली नाही. 2002 साली दक्षिण कोरियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती तर यावेळी मोरोक्कोने उपांत्य फेरी गाठून आफ्रिकन देशांसाठी आजवरची सर्वोच्च कामगिरी केली.
























































