
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई विद्यापीठाचा गलथान कारभार आणि विधी विभागाच्या रखडलेल्या निकालाविरोधात महाराष्ट्र स्टुडंटस लॉ असोसिएशन (मसला)च्या नेतृत्वाखाली 13 मार्चला मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये विद्यार्थी ठिय्या आंदोलन करणार आहेत. सकाळी साडेबारा वाजता परीक्षा भवनासमोर विद्यार्थी आंदोलन करतील.
नियमानुसार विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लागणे अपेक्षित आहे, पण तसे न होता 60 दिवस उलटून देखील निकाल जाहीर न करताच विद्यापीठ प्रशासन पुढच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करीत आहे. यामध्ये विद्यार्थी नाहक भरडला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टुडंट लॉ असोसिएशनने (मसला) आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी स्पष्ट केले.
या मागण्यांसाठी आंदोलन
- विधी विभागाच्या एलएलबी सेमिस्टर 5 व 6 तसेच एलएलएम सेमिस्टर 3चे निकाल तत्काळ जाहीर करा.
- मुख्य निकाल जाहीर केल्यानंतर 10 दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करा.
- सर्व सेमिस्टरच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन हे ऑफलाइन करून विद्यापीठ स्तरावर करण्यात यावे.
- एलएलएमच्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रश्नपत्रिका देण्यात यावी.
- कंपनी सेक्रेटरी (सीएस)च्या परीक्षांमुळे विधीच्या परीक्षा पुढे ढकलू नये.





























































