बाजार समिती निवडणूक, मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा सुपडा साफ; अलिबागपाठोपाठ मुरुडमध्येही आघाडीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना आज दुसऱ्यांदा झटका बसला असून अलिबागपाठोपाठ मुरुडमध्येही त्यांचा सुपडा साफ झाला आहे. मुरुड एपीएमसीवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित करत विजयाचा गुलाल उधळला आहे. याठिकाणी मिंधे गटाला भोपळाही फोडता आलेला नाही.

अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व 18 जागा खिशात घालून आमदार महेंद्र दळवी यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला. त्यापाठोपाठ आज मुरुड एपीएमसी निवडणुकीतही मिंधे गटाला जोरदार झटका बसला असून येथेदेखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडीने 13 जागा मोठय़ा मताधिक्क्याने जिंकल्या. येथे यापूर्वीच चार जागा बिनविरोध करून महाविकास आघाडीने विजयाची सलामी दिली होती. त्यामुळे 17 पैकी एकही जागा न जिंकता आल्याने महेंद्र दळवी यांना त्यांच्या मतदारसंघातच जबरदस्त दणका बसला आहे.

शहापुरात महाविकास आघाडीला 6 जागा
शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलला 6 जागा मिळाल्या. तर मिंधे व भाजप गटाच्या शेतकरी विकास पॅनलला 7 जागा मिळाल्या आहेत.