
जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक व नगर उत्तर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांनी दारू पिऊन महिलांसोबत डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिह्यात खळबळ उडाली आहे. या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, नितीन दिनकर यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.
भाजपमधील अंतर्गत निवडणुकांचा विषय चांगलाच गाजत होता. यात नगर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदावरून राधाकृष्ण विखे व सभापती राम शिंदे असे दोन गट उभे ठाकले होते. यातून विखेसमर्थक दिनकर यांची वर्णी लागल्यानंतर अंतर्गत नाराजी पसरली होती. त्यातच आता दिनकर यांचा दारू पिऊन महिलांसमवेत नाचल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.
पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी
अहिल्यानगर जिह्यातील भाजपचे उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी महिलांना पदाचे आमिष देऊन हॉटेलला बोलावलं, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावले. त्यामुळे दिनकर यांच्या पदाचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. तसेच मंत्री विखे, प्रदेशाध्यक्ष, राम शिंदे यांनाही मेलद्वारे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.