
उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मंगळवारी (दि. 21) निळवंडे धरणही 100 टक्के भरले असून, मुळा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाचा पाणीसाठा 98.88 टक्के झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांतही पुरेसा पाणीसाठा झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागाचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत 100 टक्के भरणारे भंडारदरा धरण या वर्षी पावसाने ओढ दिल्याने 20 ते 25 दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यापाठोपाठ आता आठ हजार 382 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरणही मंगळवारी (दि. 21) दुपारी 100 टक्के भरले आहे.
गेल्या आठवड्यात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो होऊन निळवंडे धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू झाली. निळवंडे 94 टक्के भरल्यानंतर धरणातील पाणी पातळी कायम ठेवून निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मागील आठवड्यात पाऊस कमी झाला; परंतु भंडारदरा धरणातून विद्युत गृह क्रमांक 1 मधून 816 क्युसेक व वाकीच्या ओव्हरफ्लोचे 98 क्युसेक पाणी निळवंडे धरणात जमा होत होते. त्यामुळे सोमवारी (दि. 20) सायंकाळी धरणाचा पाणीसाठा 8 हजार 270 दलघफू (99.31 टक्के) झाला होता, तर मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणसाठा 8 हजार 310 दलघफू (99.88 टक्के) झाला होता. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा धरण 100 टक्के क्षमतेने भरले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला 26 हजार दलघफू क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठाही मंगळवारी सकाळी 25 हजार 709 (98.88 टक्के) झाला होता. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा मुळा धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 60 क्षमतेचे आढळा धरण 918 दलघफू (86.60 टक्के) तर सिना 2027 दलघफू (84.46 टक्के) भरलेले आहे. खैरी (533 दलघफू), घाटशिळ पारगाव (437 दलघफू) हे दोन्ही प्रकल्पही 100 टक्के क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील केवळ मांडओहोळ धरणातच सर्वात कमी 37.09 टक्के पाणीसाठा असून, परतीचा पाऊस चांगला बरसल्यास हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरू शकणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरल्याने तसेच अन्य लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागाच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
नगर जिल्ह्यात या वर्षी सरासरीच्या 107.6 टक्के पाऊस
जिल्ह्यात 1 जूनपासून 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत सरासरीच्या 107.6 टक्के पाऊस बरसला आहे. जिल्ह्यातील नगर (101), शेवगाव (131.2), पाथर्डी (152.9), नेवासा (103.1), राहुरी (108.1), संगमनेर (100.5), अकोले (149.1), कोपरगाव (115.4), श्रीरामपूर (105.5) या 9 तालुक्यांनी यावर्षी पावसाची सरासरी ओलांडली आहे. तर, श्रीगोंदा (97.8), जामखेड (91.5), पारनेर (90.5), कर्जत (87.1) व राहाता (85) हे तालुकेही सरासरीच्या जवळपास पोहोचले आहेत.
वारणा धरण 100 टक्के भरले
सांगली जिल्ह्यातील वारणा धरण मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरले. वारणा धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे. या धरणाची साठवण क्षमता पूर्ण झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.


































































