
नगर जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी पुरेशा वर्गखोल्या नाहीत. बहुतांश ठिकाणी वर्ग उघडय़ावर भरतात. 75 वर्ग निर्लेखन झाल्याने कमी झाले आहेत, तर यावर्षी तब्बल 825 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. पुरेसा निधी मिळत नसल्याने हा प्रश्न निकाली निघत नाही. परिणामी, अध्ययनावर परिणाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी शाळा बीओटीवर बांधण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाची तयारी सुरू आहे. प्राथमिक स्तरावर 58 शाळांची माहिती मागवली आहे. या शाळा ‘स्मार्ट स्कूल’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर जिह्यातील 58 शाळा निवडण्यात आल्या आहेत. त्यात जिह्याच्या दक्षिण भागातील 25, तर उत्तर भागातील 33 शाळांची निवड केली आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा लोकल बोर्डाच्या नावावर असलेल्या शाळांना पसंती देण्यात आली आहे. दक्षिण विभागात कर्जतमधील प्राथमिक शाळा, मिरजगाव, राशीन येथील मुला-मुलींच्या शाळांचा त्यात समावेश आहे. श्रीगोंद्यात शहरातील व हंगेवाडी, शेवगावात शहर व चापडगाव, घोटण, जामखेड शहर व हळगाव, पाथर्डी व तिसगाव, पारनेर मुले-मुली, नगरमध्ये जेऊर व केडगाव. उत्तरेत राहाता येथे बाभळेश्वर, साकुरी, पिंपरी निर्मळ, गोदावरी वसाहत, निमगाव कोऱहाळे, सावळीविहीर बुद्रूक, पुणतांबे, एकरुखे, अस्तगाव, केलवड. श्रीरामपूरमध्ये टाकळीभान, गोंडेगाव, गळनिंब. कोपरगाव – येसगाव, धामोरी, रवंदे. संगमनेर – आश्वी खुर्द, राजापूर, घुलेवाडी, निळवंडे, बोटा. अकोले – रणद खुर्द, भोळेवाडी, तीर्थाची वाडी. नेवासे – सोनई नं. 2, नेवासे मुले, रांजणगाव देवी, सोनई नं.1, सोनई नं. 5. राहुरी – देवळाली प्रवरा, वांबोरी, ब्राह्मणी येथील या शाळा आहेत.
जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत; परंतु त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे त्यांचा काहीच उपयोग होत नाही. जिह्यात यापूर्वी राहाता तालुक्यातील सात्रळ व कोल्हार येथील शाळा बीओटीवर बांधल्या आहेत. गेल्या वर्षीपासून हे काम सुरू आहे. कोल्हार येथील शाळेची प्रशस्त इमारत झाली आहे. बीओटीचा प्रयोग तेथे यशस्वी झाला आहे.
जिल्ह्यातून 58 शाळांची माहिती आली आहे. ती पुढील कार्यवाहीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही होईल. विकसक पुढे आल्यास या शाळा विकसित होतील. – भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक





























































