
नगर शहराजवळील फराहबक्ष महाल ही वास्तू पर्यटकांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र ठरते. ही वास्तू पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात आहे. अज्ञात व्यक्तींनी चांदबिबी महाल परिसरात असलेले कडप्प्याचे दोन बाकडे तोडले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाचे कर्मचारी जगदीश माळी यांनी फिर्याद दिली आहे.
फराहबक्ष महाल परिसरात पहाटेपासूनच पर्यटक येत असतात. सायंकाळी सहा वाजेपर्यंत या परिसरात पर्यटक असतात. सायंकाळी सहा वाजेपर्यंत फराहबक्ष महालाच्या संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार पुरातत्व विभागाचे कर्मचारी बंद करतात. तत्पूर्वी फराहबक्ष महालातील सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात येते.
गुरुवारी (दि. 4) सायंकाळी माळी यांनी पर्यटकांना फराहबक्ष महालातून बाहेर काढून प्रवेशद्वार बंद केले. त्यानंतर माळी घरी निघून गेले. दुसऱया दिवशी सकाळी त्यांनी प्रवेशद्वार उघडले, त्यावेळी महाल परिसरात असलेल्या दहापैकी दोन बाकडे तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पुरातत्व विभागाचे संरक्षण सहायक मनोज पवार यांना कळविले. त्यांच्या सूचनेनुसार माळी यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जनतेच्या सहकार्याने फराहबक्ष महाल पर्यटकांच्या सुविधेसाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करीत आहोत. टॉयलेट, डस्टबिन, बाकडे, माहिती फलक आदी लावण्यात येत आहे. चांदबिबी महाल, दमडी मशीद, पेडगाव किल्ला, फराहबक्ष महाल, कर्जतमधील मल्लिकार्जुन मंदिर, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, ढोकीतील ढोकेश्वर मंदिर, घोटण येथील मल्लिकार्जुन मंदिर, पारनेर येथील महादेव मंदिर, कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर या नगर जिह्यातील पुरातत्व संरक्षित वास्तूंमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. पाण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे.
नुकसान करणाऱयांची गय केली जाणार नाही
पुरातत्व विभागाकडून धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक या जिह्यांत सुधारणा झाल्या आहेत. मात्र, या सातपैकी केवळ नगर येथील फराहबक्ष महाल येथेच बाकडे तोडण्याचा प्रकार घडला आहे. नगर जिह्याला मोठे ऐतिहासिक वैभव लाभले आहे. यातून पर्यटन विकास होईल, त्यादृष्टीने पुरातत्व विभाग काम करीत आहे. त्यामुळे पर्यटक व नागरिकांनी भारतीय पुरातत्व विभागाला सहकार्य करावे. पुरातत्व वास्तूच्या परिसरात सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱयांची गय केली जाणार नाही. अशा समाजकंटकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मनोज पवार यांनी सांगितले.





























































