
नगर मनपा स्थायी समितीच्या आगामी सभापतिपदासाठी कुमारसिंह वाकळे व विनीत पाऊलबुद्धे इच्छुक आहेत. दोघेही आता समितीचे सदस्य झाले आहेत. त्यामुळे नवा सभापती कोण होणार? हा उत्सुकतेचा विषय आहे. दरम्यान, विद्यमान सभापती अविनाश घुले यांनी अचानक स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मनपातील राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हेही स्पष्ट झाले आहे.
नगर महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य निवडीसाठी शुक्रवारी निवडप्रक्रिया महापौर रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थितीत पार पडली. नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती यामध्ये करण्यात आली.
दरम्यान, सभापती अविनाश घुले हे याअगोदर स्थायी समितीमध्ये पहिल्या वर्षी आले होते. मात्र, पहिल्या वर्षी आठ सदस्य चिठ्ठी काढून निवृत्त होत असतात. त्यावेळी चिठ्ठीमध्ये त्यांचे नाव निघाल्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले व एक वर्ष स्थायी सदस्यत्व भूषविता आले. त्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा मागच्या वर्षी संधी दिली होती. त्यामुळे त्यांना दोन वर्षे मिळणार होती. मात्र, नव्या सदस्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे घुले यांना राजीनामा द्यावा लागला. या संदर्भात ‘माझी कोणाबद्दलही नाराजी नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला. मला 2 वर्षे सदस्यपद व सभापतिपदही मिळाले,’ असे घुले यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे पाच सदस्य झालेले आहेत. त्यामुळे नव्याने सदस्य झालेले कुमारसिंह वाकळे यांचे नाव सभापतिपदासाठी आघाडीवर आहे. मात्र, दुसरे इच्छुक पाऊलबुद्धे हेही सदस्य झाल्याने रस्सीखेच रंगणार आहे.
हे आहेत नूतन सदस्य
शिवसेनेकडून मंगला लोखंडे व गणेश कवडे यांची, काँग्रेसकडून रूपाली निखिल वारे, भाजपकडून राहुल कांबळे, गौरी ननवरे, राष्ट्रवादीकडून कुमारसिंह वाकळे, ज्योती गाडे, विनीत पाऊलबुद्धे व मीना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांतील चव्हाण यांची घुले यांच्या जागी नियुक्ती झाली असल्याने त्यांना आता एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे.





























































