
नगर शहरातील शंभर ते दीडशे वर्षांपासून लाखो नागरिकांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद असलेल्या महापालिकेच्या जुन्या कार्यालयातील रेकॉर्ड रूमची दुरवस्था झाली असून, अनेक जुन्या रजिस्टर्सना वाळवी लागली आहे. त्यामुळे या रजिस्टर्सची अक्षरशः चाळण झाली आहे. यातील अनेक दस्ताऐवजांची संगणकीकरण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना जुन्या नोंदी सापडणार कशा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेचा कारभार नव्या कार्यालयात आल्यानंतर जन्म व मृत्यू नोंदीचा विभाग आजही जुन्या कार्यालयात कार्यरत आहेत. अनेक दिवसांपासून या जुन्या कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या केवळ चर्चाच होत आहेत. मात्र, आजवर याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. शिक्षणासाठी, प्रशासकीय कामकाजासाठी नागरिकांना जन्मासह पूर्वजांच्या मृत्यूच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. मात्र, अनेकदा या दाखल्यांचे रेकॉर्ड सापडत नाही. त्यासाठी नागरिकांना अनेकदा खेटा मारव्या लागतात.
नगर शहराची लोकसंख्या चार लाखांहून अधिक आहे. पूर्वी संगणक नसल्याने जन्म आणि मृत्यूचे दाखले हाताने लिहिले जात होते. त्यानंतर रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जात होती. कालांतराने यात बदल होऊन ही यंत्रणा संगणकीकृत करण्यात आली. मात्र, जुन्या नोंदींचे संगणकीकरण करताना अनेकांच्या नोंदी झाल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यातच महापालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेल्या शंभर ते दीडशे वर्षांपासूनच्या रजिस्टर्सची मोठी दुरवस्था झाली आहे. काही रजिस्टर्सची पाने गळून पडली आहेत, तर काही रजिस्टर्सना वाळवी लागल्याने त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे नोंदी शोधताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेतील हे रेकॉर्ड जतन करण्याची जबाबदारी जन्म व मृत्यू नोंद विभागाची आहे. मात्र, या विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी आता केंद्र सरकारमार्फत सेंट्रल रजिस्ट्रेशन (सीआरएस) यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या निविदेचा प्रस्ताव आम्ही प्रशासनाला सादर केला असून, त्यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आम्हाला त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यानंतर शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या नोंदीही या यंत्रणेत करण्यात येणार आहेत. भविष्यात परवानगी मिळाल्यास या नोंदी ऑनलाइन पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत. महापालिकेकडे असलेल्या जन्म-मृत्यूच्या नोंदींसंदर्भातील रेकॉर्ड आमच्याकडे आहे. त्यात नव्याने सीआरएस यंत्रणा राबविली, तर कुणाचाही दाखला ऑनलाइन स्वरूपात मिळू शकेल. ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.
– डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, नगर महापालिका.
2022 साली या सर्व रेकॉर्डबाबत प्रशासनाला सूचना केल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱयांचेही याकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्याच्यात सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही परत या विषयात लक्ष घालून प्रशासनाला पत्रव्यवहार करणार आहोत. प्रशासनाने वेळेत याची दखल घेतली नाही, तर ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर दिले जाईल.
– बाळासाहेब बोराटे, नगरसेवक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


























































