नगर जिल्ह्यात यंदा कांद्याची विक्रमी लागवड, दोन्ही हंगामांत एकूण पावणेदोन लाख हेक्टरवर कांदा उत्पादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप, रब्बीत मिळून कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. यंदा दोन्ही हंगामांत मिळून तब्बल 1 लाख 81 हजार 256 हेक्टर क्षेत्रावर कांदा उत्पादन घेतले. विशेष म्हणजे कांदा दरात सातत्याने चढउतार, पावसाने नुकसान आणि बियाण्यांच्या गंभीर टंचाईला सामारे जावे लागूनही क्षेत्र वाढले आहे. मागील काही वर्षांत दुष्काळाच्या झळा सोसलेल्या भागात कांद्याचे क्षेत्र अधिक आहे.

नगर जिल्ह्यात दरवर्षी साधारण 80 हजार ते एक लाख हेक्टरपर्यंत कांद्याची लागवड होत असते. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. मात्र, सातत्याने पाऊस सुरू राहिल्याने रब्बीतील ज्वारीसह अन्य पिकांची पेरणी वेळेत करता आली नाही. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र घटले. त्यात कापसाचा हंगाम पूर्ण होण्याआधीच बोंड अळी व पावसाच्या नुकसानीने कापूस काढून टाकावा लागला. या सगळ्या बाबींचा परिणाम गहू व कांदा लागवडीवर झाला आहे. यंदा रब्बीत आतापर्यंत 1 लाख 53 हजार 971 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. खरिपात यंदा 27 हजार 285 हेक्टरवर कांदा पीक घेतले.

जिल्ह्यात यंदा कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण केली गेली. मागणी असलेले बियाणे दुप्पट दराने खरेदी करावे लागले. त्यात पावसाळ्यात कांद्याचे मोठे नुकसान झाले. दरातही चढउतार सुरूच आहेत. असे असतानाही कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. विशेष करून दुष्काळाच्या झळा सोसलेल्या तालुक्यात कांदा लागवड अधिक झाली आहे. एवढय़ा प्रमाणात कांदा लागवड होण्याची ही नगर जिल्ह्यात पहिलीच वेळ आहे.

बियाण्यात मात्र फसवणूक

n कांदा बियाण्यात यंदा मात्र अनेक शेतकऱयांची फसवणूक झाली आहे. रब्बीत गावरान कांद्याची लागवड होत असते. यंदा अनेक कांदा उत्पादक कंपन्यांकडून विकल्या गेलेल्या बियाण्यात भेसळ असल्याचे उत्पादन हाती आल्यानंतर स्पष्ट झालेय. त्याचा कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे शेतकऱयांची फसवणूक होऊनही कोणत्याही कंपनीवर आजपर्यंत कृषी विभागाने कारवाई केलेली नाही.

दुष्काळी भागात क्षेत्र अधिक

n नगर जिल्ह्यात यंदा कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. त्यात यंदाची लागवड पाहता अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या पारनेर, नगर, कर्जत, संगमनेर, पाथर्डी तालुक्यात कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

वर्ष    लागवड

          (हेक्टरमध्ये)

2015-16 1,21,112

201617     89,413

2017-18 1,03426

2018-19 65,522

2019-20 1,52,900

2020-21     1,81,256