पावसाच्या हजेरीमुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग, पावणेचार लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यात सर्वदूर पावसाच्या हजेरीमुळे खरिपाच्या पेरण्यांनी चांगलाच वेग धरला आहे. जिह्यात सोमवारअखेर 3 लाख 70 हेक्टरवर खरीप हंगामातील पेरण्या पोहोचल्या असून, पेरण्यांची टक्केवारी ही 64 टक्क्यांवर पोहोचली आहे. पेरण्यांचा वेग असाच राहिल्यास येत्या आठ दिवसांत नियोजनानुसार शंभर टक्के पेरण्या होण्याचा अंदाज कृषी विभागाला आहे. झालेल्या पेरण्यांमध्ये सर्वाधिक कपाशीची लागवड झाली असून, कपाशीचे क्षेत्र 89 हजार तर सोयाबीनचे क्षेत्र 72 हजार 875 हेक्टरवर पोहोचले आहे.

नगर जिह्यात 15 जूनपासून पेरण्यांना सुरुवात झाली. यात सुरुवातीला जिह्याच्या दक्षिण भागात कडधान्य पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या. यात मूग, वटाणा, उडिद, तूर या पिकांचा समावेश आहे. मागील आठ दिवसांत अकोले भागात मोठय़ा प्रमाणात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने भात पिकाची खाचरे भरली आणि भात लागवडीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 17 हजार 276 सरासरी हेक्टरपैकी 1 हजार 748 हेक्टरवर भाताची लागवड झालेली आहे. त्याची टक्केवारी अवघी 10 टक्के आहे. याच सोबत 49 हजार हेक्टरवर बाजरी पिकाची पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी 32 टक्के आहे. बाजार पिकाऐवजी यंदा शेतकऱयांनी सोयाबीनला पसंती दिल्याने यंदा सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

चारा पिकांची 39 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, कांदा लागवडीचे प्रमाण हे 3 हजार 200 हेक्टर आहे. भाजीपाला पिकांची आकडेवारी ही 10 हजार हेक्टरच्या जवळपास आहे. लवकरच श्रावण महिना सुरू होणार असून, तेव्हापासून दिवाळीपर्यंत फुलांना मोठी मागणी असल्याने फूलशेतीची लागवड सुरू झाली आहे. 544 हेक्टरवर सध्या फूल शेती झालेली आहे. तर, 4 हजार 773 हेक्टरवर फळबागांची लागवड झालेली आहे. पुढील आठवडाभर हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असल्याने यंदाचा खरीप शेतकऱयांसाठी चांगला ठरणार असल्याचे चित्र आहे.