
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात झापले आहे. एअरसेल-मॅक्सिस सौदा आणि INX मीडिआ प्रकरणी चौकशीसाठी हजर रहा असे आदेशही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठाने दिले आहेत. 5,6,7 आणि 12 तारखेला कार्ती यांनी सक्तवसुली संचलनालयापुढे हजर रहावे असे कार्ती यांना बजावण्यात आले आहे.
कार्ती चिदंबरम यांनी विदेशात जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यापूर्वी कार्ती यांनी 10 कोटी रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले की “तुम्हाला जिथे जायचं तिथे जा,काय करायचे असेल ते करा मात्र कायद्याशी खेळू नका. कणभर जरी तुम्ही असहयोग दर्शवलात तर तुमच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल”
कार्ती याने टेनिस बॉल टुर्नामेंटसाठी फ्रान्स, स्पेन,जर्मनी, आणि इग्लंडला जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाला कार्ती यांच्या चौकशीसाठी तुम्हाला कोणत्या तारखा हव्या आहेत याची विचारणा केली होती. या तारखा बुधवारी न्यायालयाकडे सोपवण्यात आल्या. या तारखा पाहिल्यानंतर कार्ती यांना विदेशात जाण्यासाठी न्यायालयाने मंजुरी दिली.
कार्ती चिदंबरम यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे. पी.चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडिआसाठी कार्ती यांनी 305 कोटींची परकीय गुंतवणूक आणली होती. यामध्ये चिदंबरम यांच्यावर मुलाला फायदा मिळावा यासाठी कायदे हवे तसे वाकवल्याचा आरोप आहे. तर कार्ती यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे.

























































