ऐश्वर्याची कोर्टात धाव, परवानगीशिवाय जाहिरातीत फोटो वापरले

परवानगीशिवाय फोटो वापरून व्यावसायिक जाहिराती करणाऱ्यांविरोधात अभिनेत्री ऐश्वर्या रायने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऐश्वर्याने ‘पर्सनॅलिटी राईट्स’च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करावे आणि काही लोकांना माझे नाव, प्रतिमा, एआय जनरेटेड पॉर्नोग्राफिक कंटेंट वापरण्यापासून रोखावे, अशी विनंती तिने याचिकेतून कोर्टासमोर केली.

ऐश्वर्या रायच्या वकिलांनी न्यायालयाला त्या वेबसाइट्स आणि कंटेंटबद्दल माहिती दिली, ज्यावर तिच्या नावाचा आणि फोटोंचा व्यावसायिक वापर परवानगीशिवाय केला जात आहे. न्यायालयात वकिलांनी एका वेबसाइटचा दाखला देत सांगितले की, अभिनेत्रीने त्यांना परवानगी दिलेली नाही, तरीही फोटो वापरले जात आहेत. दुसऱ्या वेबसाइटवर ऐश्वर्या राय यांचे वॉलपेपर आणि फोटो टाकण्यात आले आहेत, तर तिसऱ्या कंपनीकडून त्यांच्या फोटोंचे प्रिंट असलेले टी-शर्टस् विकले जात आहेत.

परवानगीशिवाय अशा प्रकारच्या कृती त्यांच्या वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन आहेत आणि त्या थांबवणे अत्यंत आवश्यक आहे, असा युक्तिवाद ऐश्वर्या रायच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी एक आदेश पारित केला जाईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सूचित केले.