
भाजपविरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ उगारली असून राज्याची उपराजधानी नागपुरात आज विराट जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे नेते नागपूरमध्ये दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसेचे विरोधी पक्षनेते अजित पवारही सकाळी नागपुरात दाखल झाले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावत सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांवरही टिप्पणी केली.
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत अजित पवार म्हणाले की, मला एक कळत नाहीय की सगळ्यांचे माझ्यावर एवढे का प्रेम ऊतू चालले आहे? आज गुलाबराव बोलले, त्याआधी उदय सामंत, दादा भूसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचे एवढे का प्रेम ऊतू चालले आहे, तेच कळेना. पण मी माझी भूमिका तुमच्यासमोर मांडली आहे.
आज महाविकास आघाडीची सभा होत आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरू केली आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच मुंबईत अमित शहा यांची गुप्त भेट घेतल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले.
View this post on Instagram
माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारतात अजित पवार म्हणाले की, कुठे झाली? केव्हा झाली? अमित शहा मुंबईत उतरल्यापासून चॅनेल त्यांच्या पाठिशी होते. विनोद तावडे यांची आई गेल्याने ते तिकडे गेले आणि तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण सभा संध्याकाळी असल्यामुळे माझे अनिल देशमुख यांच्याशी बोलणे झाले. इथे एक कार्यक्रम आहे, तो करून दुपारी अनिल देशमुख यांच्याकडे आमचे जेवण आहे. त्यामुळे या बातम्या बिनबुडाच्या असून यात कुठलेही तथ्य नाही. अशा गोष्टी लपून राहत नसतात. माध्यमांनी आणि इतर कुणीही गैरसमज निर्माण करण्याचे काम करू नये.
































































