
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सर्वच स्तरातून उमटत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राज्यपालांवर विरोधक तुटून पडले आहेत. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालमहोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील असेही अजित पवार म्हणाले. तसेच राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधान महोदयांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुनेपुराणे असून तरुणांनी आता नवीन आदर्श शोधले पाहिजेत, असे भयंकर विधान केले. आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हीरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हीरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हीरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुनेपुराणे झाले. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी हे तुमचे आताचे आदर्श आहेत, असे राज्यपाल म्हणाले.
View this post on Instagram































































