
राजस्थानमध्ये दोन बहिणी खेळता खेळता एका गाडीत शिरल्या. त्या गाडीत अडकून या दोघींची गुदमरून मृत्यू झाला आहे. टीना बाई (8) आणि लक्ष्मी (5) अशी मृत मुलींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी परिसरात खेळत असताना जवळील वाहन दुरुस्ती केंद्रात उभी असलेल्या लाल रंगाच्या अपघातग्रस्त कारमध्ये शिरल्या. कारमध्ये बसल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद केला; मात्र त्यानंतर त्यांना तो पुन्हा उघडता आला नाही. त्यामुळे दोघीही कारमध्येच अडकून पडल्या.
मुलींचे वडील रमेश हे सलून व्यवसाय करतात. त्यांनी सकाळी मुलींना घरी सोडले आणि कामावर निघून गेले. दुपारी जेवणासाठी घरी परतल्यानंतर दोन्ही मुली न दिसल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. शोधादरम्यान दोघीही पार्क केलेल्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या.
त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघींनाही मृत घोषित केले. कारमध्ये अडकल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Heartbreaking tragedy in Alwar, Rajasthan. Two sisters lost their lives after getting trapped inside a locked car while playing. 💔
Never let children play inside parked vehicles. A few minutes of awareness can save lives.#ChildSafety #Awareness pic.twitter.com/9yCkfZ2dBQ
— Highway Heroes Of india (@raginis14728168) May 21, 2026
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यामध्ये दोन्ही मुली कारमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. रमेश यांनी सांगितले की, वाहन दुरुस्ती केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वी मुलींना त्या कारजवळ पाहिले होते आणि त्यांना तेथून दूर जाण्यास सांगितले होते.
वैशाली नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी गुरुदत्त सैनी यांनी सांगितले की, संबंधित कार अपघातग्रस्त अवस्थेत होती. तिचे इंजिन आणि बॅटरी बंद होती. कारमध्ये स्वयंचलित लॉकिंग यंत्रणा नव्हती; मात्र दरवाजा बंद झाल्यानंतर मुलींना आतून तो उघडता आला नाही. त्यामुळे त्या वाहनातच अडकून राहिल्या.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.




























































