
अटलांटिक समुद्रात जलसमाधी घेतलेल्या टायटॅनिक जहाजाबद्दलची कुतूहलता कित्येक वर्षांनंतरही कायम आहे. प्रचंड ग्लेशियरला धडकून जहाज समुद्रात बुडाले होते. त्यामुळे कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले होते. अनेक अभ्यासक समुद्रातील पडून असलेल्या विशाल जहाजाचे फोटो आणि माहिती गोळा करत आहेत. आता पहिल्यांदा या जहाजाचे वैशिष्टय़पूर्ण फोटो समोर आले आहेत. टायटॅनिकच्या मलब्याचे हे फोटो असून ते स्कॅन करून काढण्यात आले आहेत.
जहाज 3 हजार 800 मीटर खोल समुद्रात पडून आहे. मँजेलेन लिमिटेड या सी मॅपिंग कंपनीने फोटो काढले आहेत. टायटॅनिक जहाजावर माहितीपट बनवणारी कंपनी अटलांटिक प्रोडक्शनही यावर काम करत आहे. जहाजाच्या मलब्याच्या एका भागाला स्कॅन करण्याचे काम कित्येक वर्षे सुरू होतं. मात्र पहिल्यांदाच पूर्ण मलबा स्कॅन करण्यात आला आहे. स्कॅनसाठी रिमोट कंट्रोल कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. साधारण 200 तास मलबा स्कॅनिंगचे काम चालले.































































