
आश्विन कृष्ण चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमा या दरम्यान अंबाबाई मंदिरातील नित्योपचारात बदल होतो. मंदिरातील मुख्य शिखरावर 15 दिवस काकडा कापूर लावून प्रज्वलित केला जातो. चतुर्दशी दिवशी पहाटे 2 वाजता मशालीने काकडा प्रज्वलित केला जातो. यावेळी घाटी दरवाजावरील घंटेचा नाद चालू असतो.
मुख्य शिखरासह पाचही शिखरांना कापूर प्रज्वलित करून मंदिर परिसरातील सर्व देवी-देवतांसमोर कापूर प्रज्वलित केला जातो. त्यानंतर पितळी उंबऱ्य़ावर कापूर लावून मंदिराचा दरवाजा उघडून त्यानंतर गाभाऱ्य़ाचा दरवाजा उघडला जातो. त्यानंतर नित्योपचार होऊन देवीची काकडा आरती होते. इतरवेळी होणारी रात्री 10.10 मिनिटांनी होणारी शेजारती 9.40 मिनिटांनी होते आणि इतरवेळी 10.30 होणारा बंद गाभाऱ्य़ाचा दरवाजा रात्री 10 वाजता बंद होतो.
या पंधरा दिवसांत सकाळी 9.30ला होणारी आरती 6.30वा. होते. तसेच, या पंधरा दिवसांत शुक्रवारी रात्री होणारा पालखी परिक्रमा सोहळा 8.45 वाजता होतो. त्यानंतर दर शुक्रवारी होणारी पालखी परिक्रमा माघ सप्तमी अर्थात रथसप्तमीपर्यंत रात्री 9.15 वाजता होते. कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा यादिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर काकडा सोहळा समाप्त होतो.






























































