
सीमावासीयांच्या भेटीसाठी ठरलेले दौरे दोन वेळा रद्द करणारे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे डरपोक सरकार आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंबादास दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी राज्य सरकारने नेमलेल्या दोन सदस्यीय समितीमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे सीमावासीयांच्या भेटीसाठी दौरा करणार होते, परंतु कर्नाटक सरकारने दौरा करू नये असे सांगताच त्यांनी आपला दौरा रद्द केला. त्यासंदर्भात दानवे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, ‘दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार असल्याने सीमा प्रश्नात काही तोडगा निघेल असे वाटत नाही. येणाऱया काळात कर्नाटकला मदत करण्यासाठीच हा विषय उकरून काढलेला दिसतो. एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री उघड-उघड सांगलीच्या जत तालुक्यात पाणी सोडतात, सोलापूरला कर्नाटक भवन उभारणार अशी घोषणा करतात आणि आपले मंत्री 3 तारखेला जाणार, पुन्हा 6 तारखेला जाणार असे सांगून आपला दौरा रद्द करतात. त्यामुळे हे डरपोक सरकार आपल्या सीमावर्ती मराठी बांधवांना न्याय देऊ शकत नाही हे सुस्पष्ट आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार हल्ले करत आहेत. वेगवेगळे इशारे देत आहेत. दिल्लीला जाऊन वकिलांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर अवाक्षरही काढत नाहीत. हा मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.’





























































