
हृदय हेलावणाऱ्या, मन पिळऊन टाकणाऱ्या घटना आणि दुर्देवी प्रसंग कोरोना दाखवून देत आहे. आज अंबाजोगाईमध्ये 30 जणांचा अंत्यविधी करण्यात आला. एकाच चितेवर 28 जणांना अग्निडाग देण्यात आला तर दोघांचा दफनविधी करण्यात आला.
मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. कोरोनाने सर्वत्र कहर माजवला. आरोग्य यंत्रणा शेवटच्या क्षणापर्यंत त्या रूग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक जण शर्थीची लढाई लढत आहे. अशा कठीण परिस्थितीत हृदय हेलावणाऱ्या घटना घडत आहेत. अंबाजोगाईत आज मृत्युचाही उच्चांक झाला. तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला. एकाच चितेवर 28 जणांना अग्निडाग द्यावा लागला तर दोघा जणांचा दफनविधी करण्यात आला.
दुसऱ्या लाटेत मृत्युची संख्या झपाट्याने वाढत आहे. जसा संसर्ग वाढत आहे तसा मृत्युचा आकडाही वाढू लागला आहे. अंबाजोगाई नगर पालिकेच्या वतीने स्वाराती रूग्णालयामध्ये आणि लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात.
अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने एक पथकही नेमले आहे. रोज शंभरपेक्षा जास्त क्विंटल लाकडे अंत्यविधीसाठी उपलब्ध करावे लागत आहे. ही भयाण परिस्थिती कोरोनाने निर्माण केली आहे. अंत्यविधीस्थळी नातेवाईकांचे हुंदके आणि आक्रोश मन पिळवून टाकत आहे.



























































