
अफगाणिस्तानला तालिबानच्या हवाली करून अमेरिकेने अखेर बाय बाय केले. यामुळे तब्बल 20 वर्षे चाललेल्या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकन सैन्यांची पूर्ण माघार झाली आहे, अशी अधिकृत घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आणि अफगाणिस्तानची वाटचाल पुन्हा अनिश्चिततेच्या दिशेने सुरू झाली आहे. तालिबान्यांनी आनंद व्यक्त करताना उन्माद केला. हवेत गोळीबार केला. हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवून उड्डाण केले.
तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये 15 ऑगस्टला घुसून पूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळविला होता. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य वापसी होईल, एअरलिफ्ट मोहीम पूर्ण करू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केले होते. त्यानुसार एक दिवस आधीच सोमवारी दुपारी 3.29 वाजता अमेरिकेच्या शेवटच्या सी-17 विमानाने काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करीत बाय बाय केले. अमेरिकेने आजपर्यंत सर्वात दीर्घकाळ लढलेले हे युद्ध अखेर संपले आहे.
73 हजार अफगाणी नागरिकांना एअरलिफ्ट
जगातील सर्वात मोठी आणि कठीण एअरलिफ्ट मोहीम अमेरिकेने पूर्ण केली. 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत 6 हजार अमेरिकन सैनिक आणि 73 हजार अफगाणी नागरिकांना काबूल विमानतळावरून एअरलिफ्ट केले. आतापर्यंत एक ते दीड लाख अफगाणी नागरिकांनी देश सोडला आहे, अशी माहिती अमेरिकेचे सेंट्रल कमांड जनरल केनेथ फ्रँक मॅकेन्झी यांनी सांगिलते.
अमेरिकन सैनिक आणि जनतेच्या हितासाठी अफगाण सोडले – बायडन
अफगाणिस्तानात 20 वर्षांपासून असलेल्या अमेरिकन सैन्याने आता पूर्ण माघार घेतली आहे. सैन्य माघारीचा निर्णय लष्कराच्या सर्व कमांडने संयुक्तपणे घेतला होता, असे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केले. अमेरिकन सैनिकांचे प्राण वाचविण्यासाठी, आमच्या जनतेच्या हितासाठी अफगाण युद्ध थांबवून माघार घेणे हाच सर्वोत्तम पर्याय होता. दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची लढाई यापुढेही सुरू राहील, असे बायडन म्हणाले.
तालिबान्यांचा उन्माद; हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवून केले उड्डाण
अमेरिकेने देश सोडताच तालिबान्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले असून, उन्माद सुरू केला आहे. तालिबान्यांनी हातात बंदुका घेऊन काबूल विमानतळाचा ताबा घेतला. हवेत गोळीबार करीत आनंद साजरा केला.
कंदहारमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला. अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर त्यांची काही हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने अफगाणमध्येच आहेत. तालिबान्यांनी ब्लॅक होक हेलिकॉप्टरला मृतदेह दोरीने बांधून तो कंदहार शहरावरून फिरवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने दहशत वाढली आहे. त्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह हेलिकॉप्टला बांधला.
अमेरिकेचे सैन्य माघारी जाताच तालिबानी दहशतवाद्यांनी पंचशीरवर हल्ला केला. मात्र, नॉदर्न अलायन्सने जोरदार प्रतिकार केला. नॉदर्न अलायन्स आणि तालिबान्यांमध्ये घनघोर लढाई सुरू असून, आठ तालिबानी ठार झाल्याचे वृत्त आहे.
अल-कायदा, तालिबानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने 20 वर्षे युद्ध छेडले; पण अफगाणची सत्ता पुन्हा तालिबानच्या हातात आली आहे. अमेरिकेने वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा 20 वर्षांत बदला घेतला.



























































