
बहनों और भाईयों, दिल थाम के बैठिये… मै आप का दोस्त अमीन सयानी… अशी स्नेहपूर्ण साद घालत गीतमालेची मंत्रमुग्ध सफर घडवणारे रेडिओचे ज्येष्ठ उद्घोषक, सूत्रसंचालक अमीन सयानी यांनी आज अखेरचा निरोप घेतला. 91व्या वर्षी अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार- रेडिओचा सुपरस्टार हरपला. या अस्सल प्रतिभावंत कलावंताच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ‘असा निवेदक पुन्हा होणे नाही,’ असे म्हणत त्यांचे चाहते आज ‘नॉस्टेल्जिक’ झाले.
अमीन सयानी वृद्धापकाळामुळे आजारी होते. मंगळवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचा मुलगा राजील सयानी यांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबईत 1932 साली जन्मलेल्या अमीन सयानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणून आकाशवाणीवर कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी हिंदी भाषेत निवेदन सुरू केले. आपल्या गोड आवाजात अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम लोकप्रिय केला. या गीतमालाचा पहिला कार्यक्रम 3 डिसेंबर 1952 रोजी प्रसारित झाला आणि संगीतप्रेमी रसिकांच्या भावजीवनात एक रोमहर्षक पर्व सुरू केले. गीतमाला सुपरहिट ठरली. देशविदेशात या कार्यक्रमाचे चाहते निर्माण झाले. कार्यक्रमाची अफाट लोकप्रियता पाहून पुढे हा कार्यक्रम एक तासाचा करण्यात आला. अमीन सयानी रेडियोच्या माध्यमातून घरोघरी पोचले. दर बुधवारी भेटणारे मित्र बनले! ‘बहनों और भाईयों!’ अशी साद घालत ‘अगले पायदान पर’ असणारे गाणे कोणते असा सवाल करत ‘अगले बुध की शाम फिर मिलेंगे’ असा वादा करत सयानी श्रोत्यांना भेटत राहिले आणि सुंदर गाण्यांचा नजराणा भेट देत राहिले…
अभिनेता, अभिनेत्री, गीतकार, संगीतकार, यांच्या दिलखुलास मुलाखतींचे ध्वनिमुद्रण हा त्यांचा लाडका विषय. त्यांनी घेतलेल्या गायक, गीतकारांच्या मुलाखती हा हिंदुस्थानच्या सांगितीक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. सयानींनी हजारो जिंगल्सला आवाज दिला. अनेक फिल्म अॅवॉर्ड, संगीतमय कार्यक्रमांचे निवेदन केले.
श्रोत्यांच्या हृदयात घर करून राहिलेला आवाज
अमीन सयानी हे फक्त नाव नव्हते तर तो एक आवाज होता… कित्येक दशके श्रोत्यांच्या हृदयात घर करून राहिलेला आवाज…रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय…! सयानींनी शैलीदार, रसाळ निवदनाने रेडिओवरील गीतांची गोडी पैकपटीने वाढवली. रसिकांच्या कित्येक पिढय़ांचे कान आपल्या निवेदनाने तृप्त केले.






























































