
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधून आपल्यावर सर्जरी होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांनी अत्यंत कमी शब्दात याबद्दल माहिती दिली होती, ज्यामुळे त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले होते. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होत की, मेडिकल कंडिशन, सर्जरी… यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही. आता अमिताभ बच्चन यांनी एक नवीन ब्लॉग शेअर केला असून त्यात त्यांनी आपल्या चात्यांचे आभार मानले आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यात त्याच्या कानात टेपसारखे काहीतरी दिसत आहे. हे फोटो पाहता असे दिसते की त्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली आहे. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्यांनी चाहत्यांचे आभार मानत लिहिलं आहे की, ‘माझ्याबद्दलची चिंता आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी आभार आणि प्रेम, या वयात डोळ्याची सर्जरी नाजूक असते’.
बॉलीवूडचे व्यस्त कलाकार
78 वर्षीय अमिताभ बच्चन या वयातही बॉलीवूडचे सर्वात व्यस्त कलाकार आहेत. अजय देवगणच्या आगामी ‘मे डे’ या सिनेमासाठी त्यांनी नुकतेच शूटिंग केले आहे. विकास बहलच्या सिनेमाचे लवकरच शूटिंग सुरू करेन, अशीही त्यांनी माहिती दिलेली आहे. बच्चन यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. बच्चन यांनी सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली होती. हा सिनेमा 18 जूनला प्रदर्शित होणार असल्याचे बिग बीने सांगितले होते.






























































