
कोणत्याही पत्रकार संघटनेने अर्णब गोस्वामी प्रकरणात बाजू घेतली नाही. परंतु भाजप त्यांची बाजू का घेत आहे, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. या सोबतच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाने जमीन दिला असतांना भाजप आंदोलन का करीत आहे? या प्रश्नावर संतप्त झालेल्या पाटील यांनी पत्रकारांनाच ‘अरे-तुरे’च्या भाषेत उत्तर दिले. त्यामुळे संतापलेल्या सर्व पत्रकारांनी प्रथम माफी मागा असे सुनावले. अखेर पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितली.
उल्लेखनीय म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या बाजूला धामणगाव रेल्वेचे आ. प्रताप अडसड बसले होते. त्यांच्यावर सुध्दा 420 चा गुन्हा दाखल आहे. तसेच भातकुलीचे तालुकाध्यक्ष यांच्यावर सुध्दा बलात्काराचा गुन्हा आहे. असे असतांना यशोमती ठाकूर यांच्याबद्दलच आंदोलन करण्याची भाषा भाजप का करीत आहे? या प्रश्नाचे उत्तर पाटील देऊ शकले नाही व अखेर त्यांनी अवघ्या 10 मिनिटात पत्रकारांची माफी मागून काढता पाय घेतला. ‘आपण वयाने मोठे असल्यामुळेच पत्रकारांसोबत अरे-कारेच्या भाषेत बोललो’ अशी सारावा सारव त्यांनी केली.































































