हिंदुस्थानी दिवसातील 4.8 तास स्मार्टफोनवर, ऍप डाऊनलोड करण्याचे प्रमाणही वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन शाळा-कॉलेज असो, ऑफिसचे काम असो किंवा मनोरंजन… बहुतांश लोक स्मार्टफोनमध्ये व्यस्त असल्याचे दिसतात. हिंदुस्थानी दिवसातील सरासरी 4.8 तास इतका वेळ स्मार्टफोनचा वापर करण्यात घालवतात, अशी धक्कादायक माहिती नुकतीच एका अहवालामधून समोर आली आहे. याशिवाय ऍप डाऊनलोड करण्याच्या प्रमाणातही 28 टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

हल्ली कामांसाठी स्मार्टफोनचा वापर होतो. ऍप ऍनीच्या रिपोर्टनुसार, स्मार्टफोनवर सर्वाधिक वेळ घालवण्यात इंडोनेशिया अग्रस्थानी आहे. इंडोनेशियातील लोक  दिवसातील 5.5 तास इतका वेळ स्मार्टफोनचा वापर करण्यात घालवतात.

इंडोनेशियापाठोपाठ 5.4 तासांसह ब्राझील दुसऱया तर 5 तासांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थान 4.8 तासांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहित सरासरी वेळ 4 तास इतकी होती.

गेमिंग ऍपची देखील हिंदुस्थानात खूप क्रेझ असल्याचे पाहायला मिळतेय. स्मार्टफोन वापरणारी प्रत्येक दुसरी व्यक्ती मोबाईलमध्ये गेम डाऊनलोड करते, असे या अहवालात म्हटले आहे.

सात धोकादायक ऍप्सना बाहेरचा रस्ता

गुगलने नुकतेच प्ले स्टोअरवरून सात धोकादायक ऍप्सना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे सात ऍप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतील तर ते तत्काळ डिलीट करा. बॅन केलेले सात ऍप्स जोकर या ट्रोजन मालवेअरने संक्रमित आहेत. नाऊ क्यूआर कोड स्कॅन, इमोजी वन कीबोर्ड, बॅटरी चार्जिंग ऑनिमेशन्स बॅटरी वॉलपेपर, डॅझलिंग कीबोर्ड, वॉल्युम बूस्टर लाऊडर साऊथ इक्विलायझर, सुपरहीरो इफेक्ट, क्लासिक इमोजी कीबोर्ड अशी बॅन करण्यात आलेल्या धोकादायक ऍप्सची नावे आहेत.