
सामना ऑनलाईन, मुंबई
‘महावितरण’चे वीज दर शेजारील राज्याच्या तुलनेत अवाच्यासवा असतानाही वीज आयोगाने सप्टेंबरमध्ये दिलेल्या दरवाढीने औद्योगिक ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने दरवाढ मागे घेऊन ऑगस्टमध्ये जे वीज दर होते ते मार्च 2020 पर्यंत कायम ठेवावेत या मागणीबरोबरच वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ ग्राहक 15 जानेवारीपर्यंत राज्यभर ठिकठिकाणी ‘महावितरण’च्या वीज बिलाची होळी करणार आहेत.
विजेचे वाढलेले दर स्थिर ठेवण्यासाठी जानेवारी 2014 पासून तत्कालीन सरकारने औद्योगिक ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 600 कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. पुढील 10 महिने हे अनुदान मिळाल्याने आर्थिक अडचणीतील उद्योगांना मोठा दिलासा मिळाला होत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विजेचे दर स्थिर ठेवण्यासाठी सप्टेंबर 2018 पासून मार्च 2020 पर्यंत 3400 कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी वीज ग्राहक औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीने केली आहे. त्याबाबत सरकारने अद्याप कोणतीच हलचाल न केल्याने आंदोलन तीक्र करण्याबाबतचा कृती आराखडा आज समितीने जाहीर केला आहे. त्यानुसार वीज बिलांची होळी करणे, मोर्चा काढण्यात येणार आहे.






























































